परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। मुस्लिम धर्मियांचे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा तसेच सर्वच धर्मीय महापुरुषांचा अवमान थांबवण्यासाठी कठोर प्रतिबंधक कायदे करावेत, या मागणीसाठी मजलिस तहफुज-ए-खतम-ए-नबुवतच्या वतीने परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
दिलेल्या निवेदनात सर्व धर्मीय महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कठोर कायदे करावेत., भारतीय न्याय संहिता कायद्यातील धार्मिक अनुच्छेदांचा पुनर्विचार करावा., धार्मिक अवमानाशी संबंधित प्रकरणांची न्यायालयीन सुनावणी जलदगतीने व्हावी., सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांवरील अपमानास्पद पोस्टसाठी कडक नियमावली करावी.,शहाजहाँपूर, कानपूरसारख्या प्रकरणांतील निर्दोष व्यक्तींची चौकशी करावी, तर दोषींवर कठोर कारवाई करावी आदि प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर मुफ्ती अब्बास कासमी, मुफ्ती अब्दुल अजीम कासमी, मुफ्ती सईद अन्वर कासमी, मुफ्ती साजेद नदवी, हाफेज मोहतसीम फलाही, मुफ्ती शफिक कासमी, मौलाना तलहा बेग, मुफ्ती सलीम कासमी, हाफेज रईस फईजी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आंदोलनानंतर स्टेडियम परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आंदोलनाला पाठिंबा दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis