भारताच्या आधुनिक इतिहासात २०२५ हे वर्ष एक अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली ही संस्था, आज जगातील सर्वांत मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एक मानली जाते. एका शतकाच्या कालखंडात संघाने राजकारण, समाजकारण, संस्कृती, शिक्षण, सेवा आणि राष्ट्रीय जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्राला स्पर्श केला आहे. परंतु या प्रवासामागे उभा असलेला महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. केशव बळिराम हेडगेवार होय.त्यांचे जीवन हे केवळ एका संस्थापकाचे नव्हे, तर राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा ध्यास घेतलेल्या एका द्रष्ट्याचे जीवन आहे. भारताची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य धोक्यात आलेल्या काळात त्यांनी “हिंदू समाजाचे संघटन” हे आपले ध्येय केले. या लेखात आपण डॉ. हेडगेवारांचे जीवन, त्यांचे विचार आणि संघाचा शतकभराचा प्रवास याचे ऐतिहासिक व विचारधारात्मक दर्शन घेऊ.
बालपण आणि संस्कार
नागपूर जवळील एका कुटुंबात १८८९ मध्ये वर्षप्रतिपदेच्या दिवशी जन्मलेल्या केशव बळिराम हेडगेवारांना बालपणापासूनच राष्ट्रभक्तीचे संस्कार लाभले. त्यांचे वडील बळीरामपंत आणि आई रेवतीबाई हे धार्मिक, संस्कारित कुटुंबातून आलेले होते.लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाल्याने जीवनात संघर्षाची पायाभरणी झाली. पण या संघर्षातूनच आत्मविश्वास आणि संघटनकौशल्य विकसित झाले. बालपणातच त्यांना मित्र जमविण्याची, खेळांचे नेतृत्व करण्याची आणि समाजाशी जोडून घेण्याची विलक्षण कला अवगत झाली. राणी व्हिक्टोरियाच्या वाढदिवसाच्या मिठाईला नकार देणे, सीताबर्डीच्या किल्ल्यावरून ब्रिटिशांचा झेंडा उतरवण्याचा प्रयत्न करणे ही उदाहरणे त्यांच्यातील लहान वयातील क्रांतिकारी वृत्ती दर्शवतात.
क्रांतिकारक जीवन (१९०९–१९१५)
शिक्षणासाठी ते कलकत्त्याला गेले. तिथे त्यांनी नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासोबतच ते बंगालमधील क्रांतिकारी चळवळीशी सक्रियरीत्या जोडले गेले. अनुशीलन समितीशी त्यांचा निकट संबंध होता. या समितीत त्यांना “कोकेन” या टोपणनावाने ओळखले जाई.हेडगेवार अनेकदा नागपूरला परतताना सोबत शस्त्रे आणि स्फोटके आणत असत. त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय होते मातृभूमीचे स्वातंत्र्य. तरीही त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. १९१४ मध्ये एल.एम. अँड एस. पदवी घेतली. बँकॉक येथे चांगल्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी ती नाकारून भारतात परत येणे पसंत केले. कारण त्यांचे मन राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात गुंतलेले होते.
काँग्रेसमधील अनुभव व मर्यादा
पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी टिळकांच्या होमरूल चळवळीत भाग घेतला. काही काळ त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय काम केले. नागपूर येथे १९२० मधील काँग्रेस अधिवेशनाच्या आयोजनात त्यांनी प्रभावी भूमिका बजावली. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे ते प्रदेशातील काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. तथापि, लवकरच त्यांना जाणीव झाली की काँग्रेसची राजकीय भूमिका प्रामुख्याने “ब्रिटिशांविरोधात आंदोलन” एवढीच मर्यादित आहे. हिंदू समाजाचे अंतर्गत संघटन, त्यांची सांस्कृतिक व ऐतिहासिक जाणीव जागृत करणे, त्यांचे आत्मभान दृढ करणे – या गोष्टींकडे कोणतेही लक्ष दिले जात नव्हते. हेडगेवारांना खात्री पटली की केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नाही; त्यासाठी समाजाचा अंतर्गत पुनर्जागरण आवश्यक आहे.
संघ स्थापनेची पार्श्वभूमी
भारत शतकानुशतके परकीय आक्रमणांचा बळी ठरला होता. ग्रीक, शक, हूण, मुसलमान, युरोपीय – अनेक आक्रमक आले. भारतीय संस्कृतीने काहींना सामावून घेतले, काहींना पराभूत केले. पण इस्लामी व इंग्रजी आक्रमणानंतर समाजाचे संघटन तुटले. जातीभेद, प्रांतभेद, भाषा, पंथ यांच्या आधारावर समाजात विभागणी झाली. हेडगेवारांनी अनुभवले की, हिंदू समाज विस्कळीत झाला आहे, आत्मविश्वास हरवला आहे.परकीयांच्या “फोडा आणि राज्य करा” धोरणामुळे आपसांतच दुही वाढली आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी हिंदू संघटन हे ध्येय ठरवले. आणि २७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या पवित्र दिवशी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
संघाची रचना आणि शाखा
संघाची मूलभूत एकक आहे “शाखा”. मैदानावर स्वयंसेवक एकत्र येतात, प्रार्थना करतात, खेळतात, व्यायाम करतात, देशभक्तीपर चर्चा करतात. या साध्या रचनेतून निर्माण होतो संघटित, अनुशासित, राष्ट्राभिमानी तरुण. डॉ. हेडगेवारांचे तत्त्वज्ञान साधे पण गहन होते “संघ काही करीत नाही; स्वयंसेवक सर्व काही करतो.”त्यांच्या दृष्टीने संघ हा व्यक्तिनिर्मितीचा कारखाना होता. एकदा व्यक्ती तयार झाली की तो कुठल्याही क्षेत्रात गेल्यावर राष्ट्रीय भावनेने काम करेल.
डॉ. हेडगेवारांचे विचार
1. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व – भारताचा आत्मा हा हिंदू संस्कृती आहे. “हिंदू” हा शब्द कोणत्याही पंथ किंवा जातीपुरता मर्यादित नसून तो भारतीय सभ्यतेचा पर्याय आहे.
2. संघटन हेच औषध – असंघटित समाज नेहमी पराभूत होतो. संघटन, शिस्त आणि सामूहिक आत्मभान हेच राष्ट्रीय पुनरुत्थानाचे साधन.
3. स्वयंसेवकाचा विकास – शरीर, मन आणि चारित्र्य या तीन पातळ्यांवर स्वयंसेवकाचा विकास व्हावा, हे त्यांचे ध्येय.
4. राजकारणापलीकडील राष्ट्रकार्य – स्वातंत्र्य मिळाले तरी राष्ट्र टिकण्यासाठी संघटन आवश्यक आहे. म्हणूनच संघ हे केवळ राजकीय आंदोलन नव्हे, तर एक सामाजिक-सांस्कृतिक चळवळ आहे.
प्रारंभीचे आव्हाने आणि प्रवास
संघ स्थापन झाल्यावर लगेचच ब्रिटिश सरकार सावध झाले. तरीही हेडगेवारांनी कोणतेही राजकीय आंदोलन थेट संघाच्या नावाने केले नाही. त्यांनी स्पष्ट केले की संघ हा दीर्घकालीन राष्ट्रकार्याचा पाया घालणारा उपक्रम आहे. १९३० च्या सविनय कायदेभंग आंदोलनात मात्र त्यांनी वैयक्तिकरित्या भाग घेतला आणि कारावास भोगला. यामुळे जनतेत त्यांचा आदर अधिक वाढला. संघाची पहिली पिढी – अप्पाजी जोशी, भाऊराव देवरस, बाळासाहेब देशपांडे यांसारखे कार्यकर्ते – देशभर संघकार्य नेण्यासाठी पुढे सरसावले.
उत्तरार्ध आणि वारसा
साधारणपणे १९३९–४० मध्ये डॉक्टरांची तब्येत बिघडू लागली. तरीही त्यांनी अखेरच्या दिवसापर्यंत संघशिक्षा वर्गात जाऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.२१ जून १९४० रोजी ते निधन पावले.त्यांच्या मृत्यूनंतर संघाचे नेतृत्व माधवराव सदाशिवराव गोलवलकर (गुरुजी) यांच्याकडे गेले. डॉक्टरांनी घालून दिलेल्या रचनेमुळे आणि संस्कारांमुळे संघाची पायाभरणी एवढी मजबूत होती की संस्था पुढे वेगाने वाढत राहिली.
संघाचे शतकीय वैभव
आज संघाच्या कार्यातून अनेक उपसंस्था उभ्या राहिल्या आहेत यात विद्यार्थी क्षेत्रात – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,कामगार क्षेत्रात – भारतीय मजूर संघ, शेतकरी क्षेत्रात – भारतीय किसान संघ, सेवा क्षेत्रात – सेवा भारती,शिक्षण क्षेत्रात – विद्या भारती,राजकीय क्षेत्रात – भारतीय जनता पक्ष यांचा समावेश आहे. आज लाखो स्वयंसेवक देशभर शाखेत येतात. आपत्ती व्यवस्थापनापासून ते सामाजिक समरसता, गावे दत्तक घेणे, शिक्षणप्रसार – सर्वच क्षेत्रांत स्वयंसेवक कार्यरत आहेत.भारत आज स्वतंत्र आहे, परंतु सामाजिक विषमता, सांप्रदायिक दंगे,पाश्चात्त्य सांस्कृतिक आघात,तंत्रज्ञानाच्या गतीत हरवणारे मूल्यया सगळ्यांना सामोरे जाण्यासाठी संघाचे मूलतत्त्व व्यक्तिनिर्मिती व समाजसंघटन आजही तितकेच महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा शतकीय प्रवास हा एका व्यक्तीच्या दृढ निश्चयाचा पुरावा आहे. डॉ. हेडगेवारांनी सुरू केलेल्या छोट्याशा उपक्रमाने आज जागतिक स्वरूप घेतले आहे.“हिंदवः सोदरा सर्वे” ( आम्ही सारे हिंदू बंधू आहोत) हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी संघाची स्थापना केली. आज त्या विचाराने लाखो स्वयंसेवक प्रेरित झाले आहेत.शतकानंतरही डॉ. हेडगेवारांचे विचार तितकेच जिवंत आणि उपयुक्त आहेत. ते खरेच “शतकाचे साक्षीदार” आहेत.
सुधांशु जोशी
हिंदुस्थान समाचार