
नवी मुंबई, १० जानेवारी (हिं.स.) : राज्यभरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात भाजपाचे गणेश नाईक आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे आमनेसामने उभे ठाकले आहेत. असाच सामना नवी मुंबई महापालिकेसाठी रंगला आहे. जर तुम्ही उन्माद कराल, तर तो मोडून काढण्याची ताकद माझ्याकडे आहे. त्यामुळे टांगा पलटी होईल आणि घोडे फरार होतील, असा थेट इशारावजा आव्हान गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. एका जाहीर सभेत ते बोलत होते.
जसजसा मतदानाचा दिवस जवळ येतोय तसतसे नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुतीमधील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर, भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, जागावाटप आणि स्थानिक वर्चस्वावरून या दोन्ही पक्षांत गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून नाईक समर्थकांना डिवचल्यानंतर हा संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. सार्वजनिक व्यासपीठावरून एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत नेत्यांची मजल गेल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
मी आज ओपनली सांगतो, माझ्या नादाला जर लागलात ना... गणेश नाईकचं आता काही शिल्लक राहिलेलं नाही. मी माझ्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेऊन झालाय. मी आज 75 वर्षांचा आहे, मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट अँड फाईन आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही मी सक्षम आहे. मी रोज शांत झोपतो. सीबीआय चौकशी करेल किंवा ईडीची धाड पडेल, याची मला काही चिंता नाही. माझं सगळं ओपन आहे. धास्ती त्यांनाच आहे. लिहून ठेवा, भविष्यकाळात यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवला आहे. त्यांनी आजचं मरण फक्त उद्यावर ढकलले आहे, असे गणेश नाईक यांनी म्हटले.
गणेश नाईकांनी ठाण्याच्या राजकारणात हस्तक्षेप केल्यानंतर डिवचल्या गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत गणेश नाईकांच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी