राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना डी.एससी. प्रदान
मुंबई, १५ मार्च (हिं.स.) : राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एससी.) ही पदवी प्रदान करण्यात आली. राहुरी येथील महात्मा फुले
मुख्यमंत्री फडणवीस डी.एससी. प्रदान


मुंबई, १५ मार्च (हिं.स.) : राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एससी.) ही पदवी प्रदान करण्यात आली.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारोहात मुख्यमंत्र्यांना कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाला चालना दिल्याबद्दल ही मानद पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ४१८२ स्नातकांना पदवी, ३४६ स्नातकांना पदव्युत्तर पदवी, ७४ स्नातकांना डॉक्टरेट व ३९ स्नातकांना पदके प्रदान करण्यात आली.

राज्यातील आपला पहिला सार्वजनिक कार्यक्रम महान समाज सुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांचे नाव लाभलेल्या विद्यपीठात होत आहे तसेच या कार्यक्रमात राज्याचे युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देण्यात येत असल्यामुळे आपल्याकरिता हा दीक्षांत समारोह संस्मरणीय आहे असे राज्यपालांनी सांगितले.

पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला 'जय जवान जय किसान' हा नारा दिला. पुढे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याला 'जय विज्ञान'ची जोड दिली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला 'जय अनुसंधान' ही जोड दिली. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाची भूमिका निभावू शकेल असे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या स्थापनेपासून विद्यापीठाने दीड लाखांहून अधिक कुशल मानवी संसाधनांची निर्मिती केली; ३२० उच्च उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या जाती तसेच ५६ कृषी अवजारे विकसित केली तसेच १,९२५ सुधारित शेती तंत्रे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

राष्ट्रसेवेशिवाय जीवनाला पूर्णता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात काम करताना देशाच्या सेवेत जीवन व्यतीत करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

दीक्षांत समारोहाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्र-कुलपती दत्तात्रय भरणे, राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ अशोक कुमार सिंह, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विलास खर्चे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande