
नवी दिल्ली , 15 मार्च (हिं.स.)।नेपाळमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मध्य नेपाळ भागात भारतीय भाविकांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळल्याने अपघात घडला आहे. माहितीनुसार या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनेची माहिती देताच तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
माहितीनुसार, नेपाळच्या मध्य भागात भारतीय तीर्थयात्रेकरूंना घेऊन जाणारी प्रवासी बस अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आणखी सात जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी नेपाळच्या गंडकी प्रांतात घडली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तीर्थयात्रेकरूंना घेऊन जाणारी बस मनकामना मंदिरावरून परत येत होती. त्यावेळी गोरखा जिल्ह्यात बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याखालील दरीत कोसळली. गोरखा जिल्हा वाहतूक पोलीस कार्यालयाचे प्रमुख सूरज आर्याल यांनी सांगितले की मृतांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पोलीस कार्यालयाचे प्रमुख भरत बहादुर बीके यांनी सांगितले की मृतांची ओळख पुढीलप्रमाणे पटली आहे —
मुथु कुमार (५८), अनामलिक (५८), मीनाक्षी (५९), शिवगामी (५३), विजयल (५७), मीना (५८) आणि तमिळारसी (६०).
मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात जखमी झालेल्या सात प्रवाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना आंबुखैरेनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, इलेक्ट्रिक बसचा चालक थोडक्यात बचावला, तर त्याचा सहाय्यक या अपघातात जखमी झाला आहे. पोलिसांनी सांगितले की या दुर्घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode