
रत्नागिरी, 10 जानेवारी, (हिं. स.) | भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एच टू ई पॉवर सिस्टीम्स महाराष्ट्र राज्य निवड (अमॅच्युअर ग्रुप) फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मूळचे रत्नागिरीचे कै. सप्रे यांच्या या उदंड कार्याला आदरांजली म्हणून दिलीप नवरे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला २०१३ साली सुरुवात झाली. के. जी. एन सरस्वती फौंडेशन, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, चेसमेन रत्नागिरी संस्थेचे कै. दिलीप टिकेकर व प्रसन्न आंबुलकर यांच्या अथक प्रयत्नांनी ही स्पर्धा उत्तरोत्तर नावारूपाला आली आणि दक्षिण महाराष्ट्रातील तसेच मुंबई पुण्यातील खेळाडूंच्या पसंतीस उतरु लागली. २०१५ व २०२० साली फिडे मानांकन जलद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावर्षी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि केजीएन सरस्वती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. क्लासिकल टाइम कंट्रोल प्रकारात आयोजित करण्यात येत असलेली ही रत्नागिरीच्या बुद्धिबळ इतिहासातील पहिलीच फिडे मानांकन स्पर्धा आहे.
एचटूई पॉवर सिस्टीम्स कंपनीकडून वर्षभरातील सर्व राज्य निवड स्पर्धांना एकूण बक्षीस रकमेच्या ५० टक्के रकमेचे प्रायोजकत्व मिळाले आहे.
येथील मराठा भवन मंगल कार्यालयात ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत रोख रक्कम, चषक अशा स्वरूपात विविध वयोगट, रेटिंग कॅटेगरी आणि महिला व वरिष्ठ खेळाडू अशा गटांत बक्षिसे देण्यात येणार आहेत. भारतीय बुद्धिबळ संघाचा प्रशिक्षक ग्रँडमास्टर नारायणन श्रीनाथ, आंतरराष्ट्रीय मास्टर नुबेरशाह शेख, आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे, उझ्बेकिस्तानचा ग्रँडमास्टर अब्दुमलीक अब्दीसलीमोव्ह (ऑनलाइन स्पर्धा) अशा नामांकित खेळाडूंनी पूर्वी सप्रे स्मृती स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आहे.
कोणत्याही बुद्धिबळ खेळाडूच्या आयुष्यात फिडे मानांकन मिळवणे हा पुढील वाटचालीसाठी पहिला टप्पा असतो. आपले खाते जागतिक गुणतालिका स्तरावर उघडून त्यात जितकी जास्त भर तो खेळाडू घालतो तितका तो नावाजला जाऊ लागतो. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा आणि आपला कस पणाला लावून फिडे मानांकन मिळवावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी केले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी