महिला पोलीस संघाची दमदार कामगिरी; वुमेन्स प्रीमिअर लिगमध्ये तृतीय क्रमांक
लातूर, 11 मार्च, (हिं.स.)। कर्तव्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. “लातूर वुमेन्स प्रीमिअर लिग – २०२६” या महिला क्रिकेट स्पर्धेत लातूर पोलिसांच्या महि
महिला पोलिस


लातूर, 11 मार्च, (हिं.स.)। कर्तव्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. “लातूर वुमेन्स प्रीमिअर लिग – २०२६” या महिला क्रिकेट स्पर्धेत लातूर पोलिसांच्या महिला क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.

राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि अस्तित्व सेवाभावी बहुउद्देशीय प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू महाविद्यालय क्रीडा संकुल, हरंगुळ स्टेशनजवळ बार्शी रोड येथे या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत लातूर महिला पोलीस संघाने चुरशीच्या सामन्यांमध्ये दमदार खेळ करत तिसरे स्थान मिळवले.

दैनंदिन पोलीस कर्तव्ये, बंदोबस्त व तपासकामांच्या व्यस्त वेळापत्रकातही महिला खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि खेळाडूवृत्ती कौतुकास्पद ठरली. या यशामुळे लातूर जिल्हा पोलीस दलाचा मान उंचावला आहे.

याचबरोबर लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार नामदेव पाटील यांनीही क्रीडा क्षेत्रात यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे सांगली येथे आयोजित चाचणी स्पर्धेत त्यांनी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांची कोलकाता येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार राजेश्री हिंगणे तसेच खेळाडू राधा पवार, सावित्रा रायफले, सीमा बेदरे, मीना पवार, सुजाता कसपटे, सोनाली ढगे, दीपिका शिवलकर, पल्लवी चीलगर, लक्ष्मी शेळके, अंजली गायकवाड, प्रेमा बिराजदार, सोनी शेख, सारिका शिंदे यांचे कौतुक केले. तसेच बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक मिळवणारे नामदेव पाटील आणि संघाचे प्रशिक्षक रामलिंग शिंदे यांनाही शुभेच्छा दिल्या.

आगामी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये लातूर जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी अधिक यश संपादन करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande