
नवी दिल्ली, 12 जानेवारी (हिं.स.)। डीआरडीओच्या हैद्राबाद स्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने महाराष्ट्रातील अहिल्या नगर येथील केके रेंजमध्ये फिरत्या लक्ष्यावर हल्ला करण्याची उच्च क्षमता असलेल्या थर्ड जनरेशन फायर अँड फॉरगेट मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड (एमपीएटीजीएम) क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली.
स्वदेशात विकसित केलेल्या एमपीएटीजीएममध्ये इमेजिंग इन्फ्रारेड (आयआयआर) होमिंग सीकर, ऑल इलेक्ट्रिक कंट्रोल अॅक्च्युएशन सिस्टम, फायर कंट्रोल सिस्टम, टँडम वॉरहेड, प्रोपल्शन सिस्टम आणि हाय परफॉर्मन्स साईटिंग सिस्टम यासारख्या अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश आहे, जे रिसर्च सेंटर इमारत, हैद्राबाद , टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी, चंदीगड, हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी, पुणे आणि इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डेहराडून या डीआरडीओच्या सहाय्यक प्रयोगशाळांनी विकसित केले आहे.
जोधपूर येथील संरक्षण प्रयोगशाळेने टार्गेट टॅन्कची प्रतिकृती तयार करण्यासाठी थर्मल टार्गेट सिस्टम विकसित केली आहे. आयआयआर सीकर दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी युद्ध संचालनात सक्षम आहे. याचे वॉरहेड आधुनिक मुख्य युद्ध रणगाड्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे शस्त्र प्रणालीसाठी विकास-सह-उत्पादन भागीदार (डीसीपीपी) आहेत. हे क्षेपणास्त्र ट्रायपॉड किंवा लष्करी वाहन लाँचरवरून डागता येऊ शकते.
यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, डीसीपीपी भागीदार आणि संबंधित उद्योगाचे कौतुक केले आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. ते म्हणाले की चाचणी यशस्वीरित्या पार पडली , त्यामुळे ही शस्त्र प्रणाली भारतीय सैन्यात सामील होण्यास सज्ज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule