राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका निर्णायक टप्प्यावर; मंगळवारी प्रचार थांबणार
मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.) : कोरोना साथरोग, आरक्षण व विविध राजकीय घडामोडींमुळे २०१९ पासून रखडलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारानंतर गुरुवार, १५ जानेवारी रोजी मत
मुंबई महापालिका


मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.) : कोरोना साथरोग, आरक्षण व विविध राजकीय घडामोडींमुळे २०१९ पासून रखडलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारानंतर गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. कोणत्या महानगरपालिकांवर कोणाची सत्ता प्रस्थापित होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विशेषतः गेल्या २५ वर्षांपासून ठाकरे कुटुंबाच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका भाजपा-महायुती (उबाठा वगळून) काबीज करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान साम-दाम-दंड-भेद अशा सर्व मार्गांचा वापर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्या मंगळवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यानंतर दोन दिवस उमेदवारांकडून वैयक्तिक पातळीवर भेटीगाठी आणि बैठका सुरू राहणार आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश मतदार घरी उपलब्ध असतील, या अपेक्षेने सर्वपक्षीय उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर भर दिला. मात्र अनेक ठिकाणी प्रभाग रचना बदलल्यामुळे सर्व मतदारांपर्यंत थेट पोहोचणे अनेक उमेदवारांना शक्य झाले नाही.

या निवडणूक काळात अभद्र युती, आरोप-प्रत्यारोप, अनपेक्षित राजकीय घडामोडी, पैसे वाटपाचे आरोप, वादग्रस्त उमेदवार, तसेच हिंदू-मुस्लिम व मराठी-अमराठी मुद्द्यांवरून प्रचार रंगला. बिनविरोध उमेदवार निवडीचा विक्रमही यावेळी राज्याने पाहिला. त्यामुळे काही ठिकाणी मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावला गेल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.मुंबईत सत्ता टिकवण्यासाठी २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येणे ही महत्त्वाची घडामोड ठरली. शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधू व महायुतीच्या सभा विशेष लक्षवेधी ठरल्या.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारबंदी लागू होते. त्यानुसार उद्या सायंकाळी प्रचार थांबताच ‘ड्राय डे’ सुरू होणार आहे. हा निर्णय राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रांतील सर्व देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम, बिअर बार व क्लब्सना लागू राहील.

‘ड्राय डे’ वेळापत्रक :

१३ जानेवारी (मंगळवार) : सायंकाळी ५.३० नंतर मद्यविक्री बंद१४ जानेवारी (बुधवार) : मतदानाच्या आदल्या दिवशी पूर्ण बंद

१५ जानेवारी (गुरुवार) : मतदानाच्या दिवशी पूर्ण बंद

१६ जानेवारी (शुक्रवार) : मतमोजणीचा दिवस – निकाल जाहीर होईपर्यंत बंदी

मतदारांवर मद्याच्या माध्यमातून प्रभाव टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने विशेष पथके तैनात केली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईसह परवाना रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सीमावर्ती भागांत होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीवर भरारी पथकांमार्फत कडक नजर ठेवली जात आहे.दरम्यान, मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती संबंधित जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी गैरप्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande