
नवी दिल्ली, 12 जानेवारी (हिं.स.)। वित्त वर्ष 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. साधारणपणे प्रत्येक वर्षी केंद्रीय बजेट 1 फेब्रुवारीलाच सादर केले जाते, परंतु यावर्षी 1 फेब्रुवारी रविवारी आल्यामुळे काहीशी अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सोमवारी याची अधिकृत पुष्टी केली आहे.
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले की भारत सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बजेट अधिवेशन 2026 साठी संसदच्या दोन्ही सभागृहांना पाचारण करण्यास मंजुरी दिली आहे. हे अधिवेशन 28 जानेवारीला सुरू होऊन 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे. पहिला टप्पा 13 फेब्रुवारीला संपेल, तर दुसरा टप्पा 9 मार्चपासून सुरू होईल. याआधी 29 जानेवारी रोजी 2025-26 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला जाईल.
केंद्रीय बजेट 1 फेब्रुवारीला सादर करण्याची परंपरा 2017 पासून सुरू झाली. मात्र रविवारी बजेट सादर केले जाणे अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारी 1999 रोजी तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारीच सर्वसाधारण बजेट सादर केले होते. केंद्र सरकारने 2017 मध्ये बजेट सादर करण्याची तारीख 28 फेब्रुवारीवरून 1 फेब्रुवारीला बदलली होती, जेणेकरून 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाआधीच निधीचा योग्य वापर करता यावा.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा यावर्षी बजेट सादर करतील, तेव्हा हा त्यांचा सलग नववा बजेट असेल. यामुळे त्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 10 वेळा सादर केलेल्या बजेटच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचतील. तसेच निर्मला सीतारामन यांनी सलग सर्वाधिक बजेट सादर करणाऱ्या एका अर्थमंत्र्यांचा विक्रम आधीच आपल्या नावावर केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule