
इस्लामाबाद, 14 जानेवारी (हिं.स.)पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बुधवारी घोषणा केली की, भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया लाहोरमध्ये तीन आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया २९ आणि ३१ जानेवारी रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आणि १ फेब्रुवारी रोजी विश्वचषकापूर्वी दिवस-रात्र टी-२० सामने खेळणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आपले विश्वचषक गट सामने भारतात खेळणार आहे. तर पाकिस्तान त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळेल. एप्रिल २०२२ नंतर ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ २८ जानेवारी रोजी लाहोरमध्ये दाखल होणार आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे काही सामने खेळले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी आणि विश्वचषकासाठी संघ अंतिम करण्यासाठी पाकिस्तान निवडकर्ते या आठवड्याच्या अखेरीस मुख्य प्रशिक्षक माइक हेसन आणि कर्णधार सलमान अली आगा यांच्याशी भेटणार आहेत. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या मंजुरीनंतर पुढील आठवड्यात संघाची घोषणा करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे