
दुबई, 14 जानेवारी (हिं.स.)विराट कोहलीने पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व पुन्हा मिळवले आहे. आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली नंबर वन फलंदाज बनला आहे. १,४०३ दिवसांनंतर किंग कोहली पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ९१ चेंडूत ९३ धावा केल्या आणि भारतीय संघाला धावांचा पाठलाग पूर्ण करण्यास मदत केली आणि त्याला सामनावीराचा पुरस्कारने गौरवण्यातही आले होते. एकदिवसीय सामन्यात नंबर वन फलंदाज बनून कोहलीने आपले वर्चस्व पुन्हा मिळवले आहे.
विराट कोहली अलिकडेच उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेपासून, कोहलीने त्याच्या शेवटच्या पाच डावांमध्ये नाबाद ७४, १३५, १०२, नाबाद ६५ आणि ९३ धावा केल्या आहेत. जुलै २०२१ नंतर ३७ वर्षीय कोहली पहिल्यांदाच फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर परतला आहे, कारण त्याच्या खेळीमुळे भारताने वडोदरा येथे न्यूझीलंडच्या एकूण ३०० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
कोहलीने ऑक्टोबर २०१३ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. आतापर्यंत, कोहलीने एकूण ८२५ दिवस अव्वल स्थानावर विराजमान राहून सर्वाधिक काळ नंबर-वन फलंदाजांच्या यादीत १० वे स्थान पटकावले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे