
मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमधील बिनविरोध निवडीविरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. बिनविरोध उमेदवार विजयी झाल्यासही मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र सुनावणीदरम्यान खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने मांडण्यात आलेल्या चुकीच्या निवेदनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत याचिका फेटाळण्याचा निर्णय सुनावला.
सुरुवातीच्या सुनावणीत ही याचिका आधीच्या प्रलंबित याचिकांप्रमाणेच असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष सुनावणीला आल्यानंतर ऑनलाइन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी ती निवडणुकीशी संबंधित स्वतंत्र याचिका असल्याचे सांगितले. यामुळे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तुम्ही सकाळी चुकीची विधाने केली, रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत साम्य असल्याचे सांगितले, मात्र कोणतेही साम्य दिसून आले नाही. मग अशी चुकीची माहिती देण्यामागे घाई किंवा भीती काय होती?, असा थेट सवाल हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना केला. खंडपीठाने दंड आकारण्याची तयारीही व्यक्त केली होती, मात्र शेवटी दंड न आकारता याचिका फेटाळण्याचा निर्णय देण्यात आला.
दरम्यान, राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच 66 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडीत भाजपने आघाडी घेतली असून पक्षाचे तब्बल 44 उमेदवार विनाविरोध निवडून आले आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेचे 19 उमेदवार बिनविरोध विजयी ठरले असून या पक्षाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे 14 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तसेच मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली असून बिनविरोध निवड प्रक्रियेमुळे निवडणूक रंगत कमी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule