
हैद्राबाद, 14 जानेवारी (हिं.स.)। तेलंगाणामध्ये निवडणूक आश्वासन पाळण्यासाठी भटक्या कुत्र्यांच्या हत्येची धक्कादायक घटना उघड झाली असून कामारेड्डी आणि हनमकोंडा जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरात तब्बल 500 भटक्या कुत्र्यांची विषप्रयोग करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अलीकडे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांदरम्यान काही निवडून आलेल्या प्रतिनिधींनी भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून सुटका करून देण्याचे आश्वासन दिले होते आणि हेच वचन पूर्ण करण्यासाठी ही अमानुष कृत्ये केल्याचा आरोप आहे.
विषारी इंजेक्शनचा वापर
प्राणी कल्याण कार्यकर्ते अडुलापुरम गौतम यांनी माचारेड्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मते, पालवांचा मंडळातील पाच गावांमध्ये ही सामूहिक हत्या करण्यात आली. सरपंचांनी एका व्यक्तीला भाड्याने बोलावून कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देण्यास सांगितले. भवानीपेठ, फरीदपेठ, वाडी आणि बांदारामेश्वरपल्ली या गावांमध्ये कुत्र्यांचे मृतदेह कचऱ्याप्रमाणे फेकून देण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ग्रामसरपंचांसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याआधी हनमकोंडा जिल्ह्यातही श्यामपेट आणि अरेपल्ली गावांमध्ये सुमारे 300 भटक्या कुत्र्यांच्या हत्येप्रकरणी दोन महिला सरपंच आणि त्यांच्या पतींसह नऊ जणांविरुद्ध प्रकरण नोंदवण्यात आले होते. गेल्या डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी काही उमेदवारांनी भटकी कुत्रे आणि माकडांच्या त्रासातून मुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते आणि आता त्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या नावाखाली कुत्र्यांना ठार मारले जात असल्याचा आरोप पशुकल्याण कार्यकर्त्यांनी केला आहे.
पोलिसांनी सांगितले की कुत्र्यांचे मृतदेह गावांच्या बाहेरील भागात पुरण्यात आले होते. पशुवैद्यकीय पथकाने हे मृतदेह बाहेर काढून त्यांचे पोस्टमॉर्टम केले असून अंतर्गत अवयव तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. आरोपींना नोटिसा जारी करण्यात आल्या असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule