लोकसभा-विधानसभेवेळी नाही, मग मनपा मतदानाआधी 'पाडू' मशीन का आणली? - राज ठाकरे
इमरजेंसी परिस्थितीत PADU मशीन वापरलं जाईल - बीएमसी आयुक्त मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.) - मुंबईत ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी ''पाडू'' नावाची मशीन आणली आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) कोणत्याही पक्षाला दाखवलं नाही. लोकांना माहीत नाही.
राज ठाकरे


इमरजेंसी परिस्थितीत PADU मशीन वापरलं जाईल - बीएमसी आयुक्त

मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.) - मुंबईत ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी 'पाडू' नावाची मशीन आणली आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) कोणत्याही पक्षाला दाखवलं नाही. लोकांना माहीत नाही. उद्धव ठाकरे यांचं पत्र निवडणूक आयोगाला गेले. हे मशीन दाखवावं, सांगावं इथपर्यंतही सौजन्य नाही. हे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे सांगत नाही. आताच्या सरकारने वाघ कधीच मारला, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मतदानाच्या एक दिवस आधी ठाकरे बंधूंची शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट झाली. त्यानंतर मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना होण्याआधी दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ही कोणती प्रथा आहे. कोणती गोष्ट चालू आहे. कायदा बदलत आहेत. सर्वांनी हे प्रश्न विचारले पाहिजे. सरकारला जी गोष्ट हवी आहे, त्यासाठी निवडणूक आयोग आहे का? सरकारसाठी निवडणूक आयोग काम करतंय का? या निवडणुकीलाच तो नियम का? विधानसभा किंवा लोकसभेला ही गोष्ट का नाही आली. जुना नियम परत बाहेर काढावा असं का वाटलं. ईव्हीएमही जुनी आहे. ईव्हीएम जुनी झाली म्हणून युनिट लावतो. या नव्या मशीन कोणत्या आहेत. लोकांना माहीत नाही. आम्हाला माहीत नाही. काय प्रकारचं राजकारण सुरू आहे याकडे लोकांनी पाहावं. ही कोणती मशीन आहे. ती दिसते कशी. यातून काय होतं. ईव्हीएमची मशीन असते बुथवर राजकीय लोकांना बोलावून बटन दाबायला सांगता. बरोबर आहे की नाही हे दाखवता. आता नवीन मशीन आली. ती राजकीय पक्षांना दाखवावी वाटली नाही. इतकी बेबंदशाही सुरू आहे. ही कोणती निवडणूक आहे. काय चालू आहे?

दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही मुंबईतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी 13 जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. मात्र याच दरम्यान निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. आतापर्यंतच्या निवडणुकामध्ये प्रचार झाल्यानंतर एक दिवस मध्ये वेळ असतो. याआधी मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचार नव्हता. निवडणुकीची प्रथा मोडली. सरकारला जे हवं त्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय. पत्रके वाटू शकत नाही पण पैसे वाटू शकतात का?, ही मुभा आताच का? निवडणूक आयोग सरकारला जे काही हवं ते करत आहे. सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन की, आपापल्या विभागात लक्ष ठेवा. पैसे वाटप केलं जात आहे. आनंदाची गोष्ट की, काही जण त्याला विरोध करत आहे. निवडणूक आयोग याला मदत करतंय, हा आमचा आरोप आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही - भूषण गगराणी

दरम्यान PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही. अपवादात्मक (इमरजेंसी) परिस्थितीमध्ये हे PADU मशीन वापरलं जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणूण हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पाडू मशीन म्हणजे काय

EVM ला हे नवीन पाडू मशीन जोडल्या जाणार आहे. पाडू मशीन म्हणजे Deploy Printing Auxiliary Display Unit-PADU. पाडू मशीन एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे. जे ईव्हीएमसोबत जोडल्या जाणार आहे. कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट या यंत्रणा सोबत जोडण्याचे आदेश आहेत. कंट्रोल युनिटचा डिस्प्ले जर अचानक बंद झाला तर अशावेळी पाडू मशीन उपयोगात येणार असल्याची माहिती गगराणी यांनी दिली.

मुंबईसाठी 140 पाडू मशीन पाठवल्या

मतदाराला मतदान करताना मतदान प्रक्रियेदरम्यान अधिक स्पष्ट आणि मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवण्यासाठी पाडू मशीनचा वापर होणार आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाडू हे VVPAT सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाही. पाडू हे पण एक कंट्रोल युनिटच असल्याचे गगराणी म्हणाले. मुख्यतः ऑक्सिलरी डिस्प्ले देणारं हे यंत्र आहे. जे मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि दृश्यमान बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. हे बॅकअप देणारं मशीन आहे. BHEL या कंपनीने हे सयंत्र तयार केलेले आहे. कंपनीने 140 पाडू युनिट मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पाठवलेले आहेत. आरओकडं हे मशीन असेल. जसं ईव्हीएम असेल तसेच हे मशीन असेल.या यंत्राची तशी फारशी गरज भासणार नाही. पण बॅकअपचा एक पर्याय म्हणून पाडू मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर पहिल्यांदा त्याचा वापर केल्या जाईल अशी माहिती गगराणी यांनी दिली. त्यासाठी 140 पाडू युनिट दाखल झाले आहेत. त्याचा वापर होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande