ठाकरेंच्या 'भगवा गार्ड'वरून फडणवीसांनी उडवली खिल्ली
मुंबई / नागपूर, 15 जानेवारी (हिं.स.) - मुंबई मनपा निवडणूक ठाकरे बंधूंबरोबरच भाजपा-शिवसेना यांच्यासाठी अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई बनली आहे. दरम्यान या निवडणुकीत दुबार मतदारांना रोखण्यासाठी शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांनी मतदार केंद्राबाहेर अनेक
फडणवीस राज ठाकरे भगवा गार्ड


मुंबई / नागपूर, 15 जानेवारी (हिं.स.) - मुंबई मनपा निवडणूक ठाकरे बंधूंबरोबरच भाजपा-शिवसेना यांच्यासाठी अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई बनली आहे. दरम्यान या निवडणुकीत दुबार मतदारांना रोखण्यासाठी शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांनी मतदार केंद्राबाहेर अनेक मतदान केंद्रांबाहेर 'भगवा गार्ड' तैनात केले आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरे बंधूंनी जी भगवा गार्ड ब्रिगेड तयार केली आहे, ती मुंबईतील मालवणी आणि काही भागांमध्ये दिसत नाही. मला एवढचं विचारायचं आहे, त्यांना सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करायची आहे का? पण मुंबईत कोणीही दहशत निर्माण करु शकत नाही. दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही. हे काय दहशत निर्माण करणार, यांच्यात काय क्षमता उरली आहे? कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांना ठोकून काढतील, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

नागपूरात मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मुंबईत कुठलीच दहशत नाही. कोणालाही लोकांना अडवण्याचा अधिकार नाही. ते दुबार मतदानाचा आरोप करतात, त्यांच्याजवळ काय पुरावे आहेत, त्यांना याबद्दल काय माहिती आहे? दुबार मतदार शोधणे निवडणूक आयोगाचे काम आहे. त्यासाठी मारामाऱ्या करणे ही कोणती पद्धत आहे. मतदान कमी झालं पाहिजे, यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

'भगवा गार्ड'ची ही फौज मुंबईतील काही ठिकाणी दुबार मतदारांवर विशेष लक्ष ठेवून होते. यापैकी काही 'भगवा गार्ड' हे भाजपा आमदार, नेते आणि पोलिसांना नडल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना फडणवीसांनी त्यांचा आरोप फेटाळून लावला. निवडणुकांबाबत सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं. याआधीही मार्करचा वापर झाला आहे. जर काहींना शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो की, ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थेवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही. माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, असेही फडणवीस म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande