
महापालिका निवडणुकीत मार्कर पेनच्या वापरावरून झाला वाद
मुंबई, 15 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील 29 महापालिकांसाठीच्या मदतान प्रक्रियेत बोटावर शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर करण्यात आला. यावरून दिवसभर प्रचंड गोंधळ, आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने यापुढे निवडणुकांमध्ये पारंपरिक शाईचाच वापर करणार असल्याचे जाहीर केले.
मतदान केल्याची निशाणी म्हणून बोटावर लावलेली मार्कर पेनची शाई पाणी, थिनर किंवा सॅनिटायझरने सहज पुसली जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे बोगस मतदानाला वाव मिळू शकतो, असा आरोप करत विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. अनेक नागरिकांनीही याबाबत तक्रारी नोंदवल्या. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. निवडणुकीत गोंधळ निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून आपल्या बोटावरील शाई काढून दाखवली, तर अनेक पत्रकारांनीही हेच प्रयोग करून शाई सहज निघत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी विरोधकांवर पलटवार करत पराभव दिसू लागल्याने ते निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित करत असल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगत, मार्करची शाई जात नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे स्पष्ट केले. मात्र वाढत्या तक्रारी आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील निवडणुकांमध्ये मार्कर पेनऐवजी पुन्हा पारंपरिक अमिट शाईच वापरण्यात येणार असल्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी