
सोलापूर, 15 जानेवारी (हिं.स.)सोलापूर महानगरपालिका निवडणूक–२०२६ अंतर्गत आज दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सोलापूर येथील मतदान केंद्र क्रमांक ०५ येथे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, भाजप सत्तेसाठी हपापलेला असून कोणत्याही पातळीवर जाऊन ही निवडणूक लढवत आहे, हे लोकशाहीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि सोलापूरसाठी घातक आहे.
नऊ वर्षांनंतर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत असून, महाविकास आघाडी विकासाचा नवा दृष्टिकोन, नवी उमेद आणि नवी संकल्पना घेऊन जनतेसमोर गेली आहे. नागरिकांनी जात–पात–धर्म बाजूला ठेवून, मागील सत्तेचा इतिहास पाहून विकासालाच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले असून मारहाण, धमक्या, दबाव तंत्राचा वापर सुरू आहे, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे प्रकार पोलीसांसमोर घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.
आज अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी, तसेच काही ठिकाणी हाताच्या चिन्हाचे बटण कार्यरत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेक प्रभागांमध्ये दहशत निर्माण करून मतदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भाजपचा जाहीरनामा पूर्णपणे अपयशी ठरला असून पाणीपुरवठा, रस्ते, भ्रष्टाचार या कोणत्याही मुद्द्यांवर ते अपयशी ठरले आहेत, त्यामुळे भाजपविरोधात जनतेत तीव्र रोष असल्याचे त्या म्हणाल्या. उमेदवार पळविण्याचे प्रकार यापूर्वी कधीही घडले नसून, सत्ता नव्याने मिळाल्यामुळे भाजपच्या काही नेत्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतूनच सत्ताधाऱ्यांचा अहंकार उतरतो आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देते, असे सांगत खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूरला संयमी, विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. महाविकास आघाडी ही लढाई लोकशाही, संविधान आणि सोलापूरच्या विकासासाठी लढत असून, सोलापूरची जनता नक्कीच विकासाच्या बाजूने कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, साम–दाम–दंड–भेद आणि प्रशासनाच्या गैरवापरातून भाजप निवडणूक लढवत असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांना निष्पक्षपणे काम करून निवडणूक शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्याची मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड