
पुणे, 15 जानेवारी, (हिं.स.)। मूळच्या बिहारच्या असलेल्या चार महिलांनी पुणे महापालिकेत बोगस मतदान केल्याचा आरोप होत आहे. पुण्यातील वानवडी येथील सनग्रेस स्कूल मतदान केंद्रावर चौघींनी बोगस मतदान केल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. तर वीर बाजीप्रभू विद्यालय केंद्र जनवाडी परिसरातही बोगस मतदान झाल्याचं समोर आलं आहे.
अनेकांचं नाव आणि फोटो यांची यादीत गल्लत आहे. ऑनलाइन फोटो अपडेट झाला, तरी रिफ्लेक्ट न झाल्याने मतदान करायला दिलं नाही. काही ठिकाणी नवीन व्होटर आयडी आले, पण त्या आयडीप्रमाणे नावच नाही यादीत. एका ठिकाणी नाव मुलाचं आणि फोटो आईचा, असाही यादीचा घोळ पाहायला मिळाला.
दुबार नावे असलेल्यांच्या घरी महापालिका कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या आणि ४८ हजार ६२८ जणांनी दोन वेळा मतदान करणार नसल्याचे हमीपत्र भरून दिले. मात्र उर्वरित दुबार मतदार कामानिमित्त घराबाहेर गेल्याने घर बंद असणे, अन्यत्र स्थलांतर होणे आदी कारणांमुळे उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे एक लाखाहून अधिक दुबार मतदारांना रोखण्याचे आव्हान आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु