नांदेडमधील माहूर गडावर भाविकांची गर्दी
नांदेड, 15 जानेवारी (हिं.स.)। साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ शक्तीपीठ श्री रेणुका देवी व सती अनसूया मातेस मकरसंक्रांती (तिळसंक्रांती) निमित्त वाण देण्यासाठी माहूर नगरीत सुहासिनी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच भाविक महिलां
नांदेडमधील माहूर गडावर भाविकांची गर्दी


नांदेड, 15 जानेवारी (हिं.स.)। साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ शक्तीपीठ श्री रेणुका देवी व सती अनसूया मातेस मकरसंक्रांती (तिळसंक्रांती) निमित्त वाण देण्यासाठी माहूर नगरीत सुहासिनी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच भाविक महिलांनी मंदिर परिसरात हजेरी लावत श्रद्धा आणि भक्तीभावाने देवीच्या चरणी तिळगुळ व वाण अर्पण केले.

मकर संक्रांती हा सण सौख्य, समृद्धी व सौहार्दाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी 'तिळगुळ घ्या, गोड गोड बोला' या संदेशासह वान देण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार माहूर परिसरासह विदर्भ, मराठवाडा तसेच शेजारील राज्यांतून आलेल्या महिलांनी देवी रेणुका मातेस व सती अनसूया मातेस तिळगुळ, साडी, हळद-कुंकू वइतर साहित्याचे वाण अर्पण केले. मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत देवीचे दर्शन घेतले. अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी तसेच मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने दर्शनासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या गर्दीमुळे स्थानिक बाजारपेठेतही चांगलीच चहलपहल पाहायला मिळाली. श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा संगम असलेला हा सण माहूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

माहूर गडावर रेणूका मातेचे दर्शन घेण्यासाठी मराठवाड्यासह शेजारील तेलंगणा, आंध्र प्रदेशातून हजारो भाविक भक्त येत असतात. भाविकांच्या गर्दीमुळे येथे यात्रेचे स्वरूप येत असते. भाविकांची गर्दी वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने त्यांना सोईसुविधा पुरविल्या जातात. येथे आलेल्या भाविकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande