
नांदेड, 15 जानेवारी (हिं.स.)। किनवट पं.स.ला गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे रुजू झाल्या आहेत. त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्याच्या प्रशासकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामांना आता गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
वाघमारे यांच्या नियुक्तीचे किनवट तालुक्यात स्वागत होत आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंचायत समितीच्या विविध विभागांचा आढावा घेतला असून, कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. किनवट हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि दुर्गम भाग असलेला तालुका आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि घरकुल योजनेचे प्रश्न मार्गी लावणे हे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असणार आहे. शासकीय योजनांचा लाभशेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल, असा विश्वास त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला.
जयश्री वाघमारे यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी स्वागत केले आहे. त्यांच्या सामान्य जनतेला न्याय मिळेल आणि पंचायत समितीचा कारभार अधिक पारदर्शक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis