
पुणे, 15 जानेवारी, (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज धनकवडी-कात्रज डेअरी प्रभाग क्रमांक ३७ मध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. येथील प्रियदर्शनी विद्यामंदिर शाळेतील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम (EVM) मशीन तब्बल दीड तास बंद पडल्याने मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तांत्रिक बिघाडामुळे मतदानाची गती मंदावली मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्यामंदिर शाळेतील केंद्रावर सकाळी ७ वाजेपासूनच मतदारांनी उत्साहाने रांगा लावल्या होत्या. मात्र, काही वेळातच दोन केंद्रांवरील मशीनमध्ये बिघाड झाला: मतदान केंद्र ३७/५४ (रूम नंबर ११): येथील मशीन सकाळी ८:१५ वाजता अचानक बंद पडली. सव्वा तासाहून अधिक काळ मतदान थांबल्यामुळे नागरिकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. मतदान केंद्र ३७/५३ (रूम नंबर १०): या केंद्रावरील मशीन सकाळी ९:४५ ला बंद पडली. ही मशीन दुरुस्त करून सकाळी १०:२० ला पुन्हा सुरू करण्यात आली. सकाळच्या वेळी मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि नोकरदार वर्गाला या दिरंगाईमुळे मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे रांगा वाढत गेल्याने काही मतदारांनी प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली.
या संदर्भात झोनल अधिकारी भीमराव पवार यांनी स्पष्ट केले की, “यंत्रातील बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. तांत्रिक कारणास्तव मतदान थांबले असले तरी, मतदानाची वेळ अधिकृतपणे वाढवून दिली जाणार नाही. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे मतदार केंद्राच्या आवारात उपस्थित राहतील, त्या शेवटच्या मतदारापर्यंत सर्वांना मतदानाचा हक्क बजावू दिला जाईल.”
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु