राज्यात महायुतीचा झेंडा; 29 पैकी 25 महापालिकांवर सत्ता
चंद्रपूर व लातूरमध्ये काँग्रेसचा विजय मुंबई, 16 जानेवारी (हिं.स.) । महाराष्ट्रातील 19 महापालिकांच्या मतमोजणी निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणला आहे. भाजपप्रणीत महायुतीने 25 महापालिकांवर सत्ता मिळवत आपले वर्चस्व स्पष्ट केले आहे
विजयानंतर रविंद्र चव्हाणांना मिठाई देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


चंद्रपूर व लातूरमध्ये काँग्रेसचा विजय

मुंबई, 16 जानेवारी (हिं.स.) । महाराष्ट्रातील 19 महापालिकांच्या मतमोजणी निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणला आहे. भाजपप्रणीत महायुतीने 25 महापालिकांवर सत्ता मिळवत आपले वर्चस्व स्पष्ट केले आहे. तर चंद्रपूर आणि लातूर या 2 महत्त्वाच्या महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे.

राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर येथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, शहरी मतदारांनी विकास, स्थिरता आणि नेतृत्वावर विश्वास दाखवत महायुतीला पाठिंबा दिला आहे. राज्याच्या पनवेलमध्ये भाजपप्रणीत महायुतीने पुन्हा सत्ता कायम राखली असून नागपुरात भाजप सलग चौथ्यांदा सतत्तेत आली आहे. तर जालना येथे भाजपने निर्णायक विजय मिळवला आणि आपली पकड मजबूत केली आहे. तसेच धुळ्यात भाजपने 50 नगरसेवक विजयी करून मोठा विजय मिळवला आहे. तर नांदेड महापालिकेत भाजपला जनतेचा स्पष्ट पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. यासोबतच इचलकरंजी येथे देखील भाजपने जोरदार विजय मिळवला. विदर्भातील अमरावती येथे काहीशी त्रिशंकू अवस्था झाल्याचे चित्र आहे. अमरावतीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असली तरी कल महायुतीच्या बाजूने झुकलेला असल्याचे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले.

या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेससाठी बहुतेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. शहरी भागात या पक्षांचा प्रभाव घटल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदारांनी विकास, नेतृत्व आणि स्थिरतेच्या मुद्द्यावर महायुतीला पसंती दिली आहे. हे निकाल आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांसाठी गंभीर इशारा ठरतील.

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्यातील सत्ता समीकरणात महायुतीची पकड घट्ट केल्याचे चित्र आहे.

चंद्रपूर आणि लातूरमध्ये काँग्रेसला दिलासा

विदर्भातील चंद्रपूर आणि मराठवाडा भागातील लातूर येथे काँग्रेसला चांगले यश मिळाल्याचे दिसून आले. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस (14 जागा) आणि शिवसेनेच्या उबाठा गटाने (5 जागा) मिळवल्या आहेत. यासोबतच लातूर येथे काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवून 37 जागा जिंकल्या असून भाजप 17 जागांवर आघाडी मिळाली.---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande