
आलिशा फहीम खान एआयएमआयएमच्या तिकीटावर विजयी
नागपूर, 16 जानेवारी (हिं.स.) नागपूर महापालिकेच्या उत्तर नागपूरमधील प्रभाग क्रमांक ३ (ड) मधून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या उमेदवार अलिशा (लिशा) फहीम खान यांनी विजय मिळवला आहे. नागपूर दंगलीच्या प्रमुख आरोपींपैकी एक असलेले आणि सध्या जामिनावर असलेले फहीम खान यांच्या त्या पत्नी आहेत. या प्रभागातून एआयएमआयएमचे एकूण 3 उमेदवार विजयी झाले असून, शेजारच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये मुस्लिम लीगचे चारही उमेदवार निवडून आल्याने उत्तर नागपुरातील राजकीय समीकरणांकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.
राज्यात औरंगजेबाच्या कबरीबाबत झालेल्या वक्तव्यांनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा फटका नागपुरालाही बसला होता. पवित्र आयतीच्या अवमानानंतर उसळलेल्या प्रतिक्रिया पुढे दंगलीत रूपांतरित झाल्या. मार्च 2025 मध्ये महाल परिसरात घडलेल्या या दंगलीनंतर फहीम खान यांना 4 महिन्यांसाठी कारागृहात डांबण्यात आले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत खान कुटुंबाचे दुमजली घर बुलडोझरने जमीनदोस्त केले होते. या पार्श्वभूमीवर अवघ्या काही महिन्यांतच अलिशा खान यांनी राजकारणात सक्रिय पाऊल टाकत नागपूर महापालिकेची निवडणूक लढवली. प्रचारादरम्यान त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका करत प्रभागातील मूलभूत नागरी समस्यांकडे लक्ष वेधले. “घर पाडण्याच्या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ कारवाई केली; मात्र आमच्या भागातील प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत,” असा आरोप अलिशा खान यांनी केला होता.
पिवळी नदीलगतच्या वस्त्यांमध्ये दर पावसाळ्यात होणारे पाणी साचणे, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था, जीर्णावस्थेतील किंवा बंद पडलेल्या शासकीय शाळा, झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर त्यांनी प्रचार केला. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आठ किलोमीटर अंतरावरील वैद्यकीय महाविद्यालयात न्यावे लागते आणि विलंबामुळे जीवितहानी होते, असा आरोपही त्यांनी केला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना अलिशा खान म्हणाल्या की , गेल्या 17 मार्चनंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पतीच्या कारावासामुळे मला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळाली. त्यांच्या या विजयामुळे नागपूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे राज्यभरातून लक्ष दिले जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी