
पुणे, 16 जानेवारी (हिं.स.) : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी केंद्रावर काही वेळ तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील मोठ्या आक्रमक पाहायला मिळाल्या. मतमोजणी होत असताना ईव्हीएम मशीन बदलले गेल्याचा आरोप करत त्यांनी स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाळीवर चढण्याचा प्रयत्न करत असतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रुपाली ठोंबरे पुण्यातील प्रभाग क्र. २५ अ आणि २६ ब या दोन प्रभागातून निवडणूक लढवत होत्या. या दोन्ही ठिकाणी त्या पिछाडीवर आहेत. दरम्यान त्यांनी आरोप केला की, मतदानादिवशी वापरलेल्या ईव्हीएम मशीन आणि आज मतमोजणीसाठी आणलेल्या मशीनमध्ये तफावत आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक मशीन बदलल्या. मशीन बदलल्याचा आरोप करत त्यांनी मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमधील सुरक्षा जाळीवर चढून स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु