फेसबुक व्हिडिओची दखल घेत बेपत्ता मुलाचा शोध
लातूर, 17 जानेवारी (हिं.स.)। अहमदपूर पोलिसांची तत्परता ; फेसबुक व्हिडिओची दखल घेत बेपत्ता मुलाचा अक्कलकोट-गाणगापूरपर्यंत पाठलाग करून शोध सोशल मीडियावरील एका व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत, अहमदपूर पोलिसांनी केवळ ४८ तासांत एका बेपत्ता मुलाचा शोध ला
अहमदपूर पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी


लातूर, 17 जानेवारी (हिं.स.)।

अहमदपूर पोलिसांची तत्परता ; फेसबुक व्हिडिओची दखल घेत बेपत्ता मुलाचा अक्कलकोट-गाणगापूरपर्यंत पाठलाग करून शोध

सोशल मीडियावरील एका व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत, अहमदपूर पोलिसांनी केवळ ४८ तासांत एका बेपत्ता मुलाचा शोध लावून त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. अक्कलकोट, सोलापूर आणि थेट कर्नाटकच्या गाणगापूरपर्यंत तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे पाठलाग करून पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे अहमदपूर तालुक्यात कौतुक होत आहे.

​अहमदपूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , लेक्चर कॉलनी, अहमदपूर येथील मारोती शिवाजी नागसाखरे यांचा १५ वर्षीय मुलगा शुभम हा १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास घरातून बेपत्ता झाला होता. मुलाचा शोध लागत नसल्याने हवालदिल झालेल्या वडिलांनी तक्रार देण्यापूर्वी फेसबुकवर एक व्हिडिओ प्रसारित करून मदतीचे आवाहन केले होते.

​पोलिसांची 'ॲक्शन मोड'मध्ये एन्ट्री

...............................

​सदरील व्हिडिओ अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) अरविंद रायबोले आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या निदर्शनास आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फिर्यादीची वाट न पाहता तात्काळ तपास यंत्रणा कार्यान्वित केली. फिर्यादीला पोलीस स्टेशनला बोलावून रीतसर गुन्हा (गुरनं १५/२०२६) दाखल करण्यात आला.

​ तांत्रिक बाबींच्या आधारे तात्काळ तपास

.........................................

​ उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या देखरेखेखाली पोलीस निरीक्षक मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे तानाजी आरदवाड, विशाल सारोळे, हरी कांबळवाड, पद्माकर पांचाळ,विवेक आमुगे यांचे पथक तपासासाठी रवाना झाले.

​अहमदपूर बस स्थानक येथून मुलगा लातूरला गेल्याचे समजले. लातूर बस स्थानकावरील तांत्रिक बाबी तपासल्या असता मुलगा सोलापूरला गेल्याचे निष्पन्न झाले. सोलापूर येथे जाऊन पोलिसांनी पुन्हा एकदा तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला असता तो अक्कलकोटला गेल्याची खात्री केली. अक्कलकोटमध्ये शोध घेत असताना मुलाचा माग थेट कर्नाटकच्या गाणगापूरपर्यंत पोहोचला तपासाचा हा प्रवास एकदम थरारक होता

​गाणगापूर संगमावर मुलाचा शोध

.......................................

​पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता गाणगापूर गाठले. १६ जानेवारी रोजी गाणगापूर येथील 'संगम' परिसरात शोध घेत असताना शुभम पोलिसांना एका मंदिरात सुखरूप मिळून आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोनि विनोद मेत्रेवार यांनी मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

​ अहमदपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक

...........................................

​तक्रार दाखल होण्यापूर्वीच सोशल मीडियाची दखल घेऊन पोलिसांनी ज्या तप्तरतेने तीन जिल्ह्यांचा आणि दोन राज्यांचा प्रवास करून मुलाचा शोध लावला, त्याबद्दल अहमदपूर पोलिसांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे. एका मजुरी करणाऱ्या पित्याचा आधार पोलिसांनी परत मिळवून दिल्याने नागसाखरे कुटुंबाने पोलिसांचे अश्रूपूर्ण नयनांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande