सत्तास्थापनेसाठी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावे - आ. साजिद पठाण
अकोला, 17 जानेवारी, (हिं.स.)। अकोला महानगरपालिका निवडणुकीचा निकाल स्पष्ट बहुमताशिवाय लागल्याने अकोल्याच्या राजकारणात सत्तास्थापनेबाबत हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठ
Photo


अकोला, 17 जानेवारी, (हिं.स.)। अकोला महानगरपालिका निवडणुकीचा निकाल स्पष्ट बहुमताशिवाय लागल्याने अकोल्याच्या राजकारणात सत्तास्थापनेबाबत हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले आहे.

शुक्रवारी मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाला. या निकालात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सत्तेचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मतदारांनी स्पष्ट कौल दिला नसल्याचे निकालावरून स्पष्ट होत असल्याचे आमदार पठाण यांनी सांगितले. शहरातील नागरिक मागील काही वर्षांतील भाजप सत्ताधारी वर्गाच्या कारभाराला कंटाळले असून त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला आहे, असा आरोप त्यांनी केला.

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपकडून ‘६० पार’च्या घोषणा केल्या जात होत्या. मात्र प्रत्यक्षात भाजपला केवळ ३८ जागांवरच समाधान मानावे लागले. अनेक प्रभागांत भाजपचे उमेदवार अत्यंत अल्प मताधिक्याने विजयी झाले असून, हे मतदारांमधील नाराजीचे द्योतक असल्याचे आमदार पठाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपविरोधात शहरात असंतोषाची लाट असल्याचे या निकालातून दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

मतदारांनी दिलेला कौल लक्षात घेता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य समविचारी पक्षांनी चर्चेसाठी एका ठिकाणी बसावे, असे आवाहनही त्यांनी केले. महानगरपालिकेत स्थिर, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार देण्यासाठी काँग्रेस पक्ष मोठा भाऊ म्हणून सर्वस्वी तयारीत असल्याचे आमदार साजिद पठाण यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी भाजपविरोधी एकत्रित सत्ता स्थापन होणे हीच नागरिकांची अपेक्षा असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

तर भाजपविरोधी पक्षांनी मिळून महापालिकेवर सत्ता स्थापन केल्यास मागील काळात झालेली अवाजवी करवाढ ही कमी करण्यात येणार, निःशुल्क कचरा घंटागाडी यांसह स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अकोलेकरांना मिळणार असल्याचा विश्वास आ. पठाण यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande