बीड - डॉ. प्रमोद शिंदे यांची आयएमए राज्य समिती सदस्यपदी नियुक्ती
बीड, 17 जानेवारी (हिं.स.)। बीडचे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद शिंदे यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य रस्ता अपघात व आपत्कालीन मदत समितीवर ज्येष्ठ मार्गदर्शक व कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती आयएमएचे राज
बीड - डॉ. प्रमोद शिंदे यांची आयएमए राज्य समिती सदस्यपदी नियुक्ती


बीड, 17 जानेवारी (हिं.स.)। बीडचे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद शिंदे यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य रस्ता अपघात व आपत्कालीन मदत समितीवर ज्येष्ठ मार्गदर्शक व कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी केली.

सदर समिती रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत देणे, जीवितहानी कमी करणे, तसेच डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी व सामान्य जनतेसाठी प्रशिक्षण व जनजागृती यावर काम करणार आहे. राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे होणाऱ्या जखमा, मृत्यू व अपंगत्व कमी करण्यासाठी समिती विश्लेषण व मार्गदर्शन करेल. डॉ. प्रमोद शिंदे हे सह्याद्री ऑर्थो केअर हॉस्पिटलचे संचालक आहेत. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, आयएमए बीड सचिव, बीड अस्थिरोग संघटना अध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा राज्यस्तरीय गौरव झाला आहे. या नियुक्तीबद्दल डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई, आयएमए बीड अध्यक्ष डॉ. अनंत मुळे, डॉ. सचिन आंधळकर, डॉ. टी. एल. देशमुख, डॉ. एस. वाय. जाधव व इतर सदस्यांनी व त्यांच्या हितचिंतकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande