
रायगड, 17 जानेवारी (हिं.स.)। “स्वच्छ भारत”चा गाजावाजा करणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीची प्रत्यक्षात स्वच्छतेबाबतची दयनीय अवस्था उघडकीस आली आहे. गावातील कचरावाहू घंटागाडी गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत असून तिच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेरळ उपशहर प्रमुख संदीप नारायण उतेकर यांनी केला आहे.
ग्रामपंचायत हद्दीत घराघरातील कचरा उचलण्यासाठी असलेली घंटागाडी कधी येते तर कधी येतच नाही. अनेकदा ती केवळ शिट्टी वाजवत पुढे निघून जाते. घंटागाडीचे भोंगे बंद असून वाहनाची अवस्था अत्यंत खराब आहे. वारंवार बिघाड, धक्के मारून चालवावी लागणारी गाडी आणि बंद पडलेले भोंगे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
परिणामी नागरिकांना कचऱ्याच्या पिशव्या हातात उचलून रस्त्यावर उभे राहावे लागते. मात्र वृद्ध, महिला व आजारी नागरिकांना हे शक्य नसल्याने घरातील कचरा गटारात, रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत टाकला जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून डास, माशांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. तरीही ग्रामपंचायत प्रशासन ढिम्म असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे वॉर्ड क्रमांक ५ मध्ये नियमित फवारणी होत नसून गटारसफाई पूर्णतः ठप्प आहे. ग्रामसेवकांकडून केवळ फोनवर सूचना दिल्या जातात, प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. हा प्रकार म्हणजे जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करण्यासारखा असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर संदीप उतेकर यांनी ग्रामपंचायत प्रशासन व गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरत घंटागाडीची तातडीने दुरुस्ती, पर्यायी वाहन उपलब्ध करून देणे, नियमित कचरा उचल, गटारसफाई व फवारणी त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके