
जळगाव, 2 जानेवारी (हिं.स.) आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ६ वी तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी मधील अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नाशिक विभागांतर्गत १) पेठ रोड, ता.जि. नाशिक, २) पिंप्री सडोदीन, ता. इगतपुरी, ३) नंदुरबार, ता.जि. नंदुरबार, ४) अजमेर सौदाणे, ता. बागलाण, ५) मवेशी, ता. अकोला, ६) पिंपळनेर, ता. साक्री, ७) टिटवे, ता. दिंडोरी, ८) ढोगसांगळी, ता. नवापूर, ९) चणकापूर, ता. सटाणा, १०) शिदें दिगर, ता. सुरगाणा, ११) सरी, ता. अक्कलकुवा, १२) रोषमाळ, ता. घडगाव, १३) देवगाव, ता. पेठ, १४) बोरीपाडा, ता. त्र्यंबकेश्वर, १५) खरवड, ता. तळोदा, १६) मोहिदा, ता. शहादा, १७) भाडणे, ता. साक्री या शाळांचा समावेश आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी सन २०२६-२७ मध्ये इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशास पात्र राहतील. तसेच इयत्ता ६ वी ते ९ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही प्रक्रिया लागू राहणार आहे.
या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अमळनेर व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापुरी, ता. जामनेर, जि. जळगाव येथे घेण्यात येणार आहे. इयत्ता ६ वी साठी परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ व इयत्ता ७ वी ते ९ वी साठी सकाळी ११ ते दुपारी २ अशी राहील.प्रवेश अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच सर्व संबंधित मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज स्वतःच्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांच्याकडे दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच संबंधित मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे. ही प्रवेश प्रक्रिया शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये ६ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून पालक शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावेत, अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के तर आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर