महाराष्ट्र गट–क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा; जळगाव शहरात कलम १६३ लागू
जळगाव, 02 जानेवारी (हिं.स.) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट–क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा–२०२५ रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जळगाव शहरातील एकूण 14 परीक्षा केंद्रांवर घेण
महाराष्ट्र गट–क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा; जळगाव शहरात कलम १६३ लागू


जळगाव, 02 जानेवारी (हिं.स.) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट–क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा–२०२५ रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जळगाव शहरातील एकूण 14 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परिक्षा कालावधीत परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांवर कोणतेही गैरप्रकार घडू नयेत तसेच कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार, परीक्षा सुरू झाल्यापासून ते परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलीस व होमगार्ड यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच, सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश “कॉपीमुक्त अभियान” यशस्वीरीत्या राबविण्याच्या दृष्टीने काढण्यात आला असून, सर्व संबंधितांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande