
सातारा, 02 जानेवारी (हिं.स.) : महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी भाषेचीच सक्ती असून इतर कोणत्याही भाषेची सक्ती नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. परदेशी भाषांना प्राधान्य देताना भारतीय भाषांना विरोध करण्याची भूमिका योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘भाषेला विरोध नाही, मात्र सक्तीला विरोध आहे’ अशी भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “महाराष्ट्रात सक्ती केवळ मराठी भाषेचीच आहे,” असे ठामपणे सांगितले.
याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, मराठी भाषेशिवाय अन्य कोणत्याही भाषेची सक्ती करण्यात आलेली नाही. त्रिभाषा सूत्रांतर्गत आणखी कोणती भाषा समाविष्ट करावी व ती कोणत्या वर्गापासून शिकवावी, याबाबत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. मराठी भाषा ही पूर्वीपासूनच अभिजात असून तिला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. या मान्यतेचा उपयोग करून मराठीला देशभर लोकमान्यता मिळवून देणे हे आपले सामूहिक कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.इंग्रजी, फ्रेंच, जर्मन यांसारख्या परदेशी भाषांचे स्वागत करताना भारतीय भाषांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही. स्वभाषेचा सन्मान राखतानाच इतर भाषांचेही स्वागत व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.मराठी साहित्याला वारकरी परंपरा आणि संतसाहित्याने समृद्ध केले असून मराठी ही केवळ भक्तीचीच नव्हे, तर मूल्यांची भाषा आहे. समाजाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यिक करीत असतात. त्यामुळे साहित्यविश्वात लोकशाही विचारांची अभिव्यक्ती अबाधित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.साहित्य संस्थांमधील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाबाबत व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “साहित्य संस्थांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही,” अशी ग्वाही दिली. साहित्यिकांनी राजकारणात यावे, मात्र साहित्यविश्वात राजकारण आणू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संमेलनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने संपूर्ण सातारा शहर साहित्याच्या वातावरणात न्हाऊन निघाले. पारंपरिक वेशभूषा, संतपरंपरा, समाजसुधारकांचे कार्य, भारतीय संस्कृती व स्थानिक साहित्यपरंपरेचे दर्शन घडविणारी ही ग्रंथदिंडी राजवाड्यापासून शाहू मैदानापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी