

* मुंबई-अहमदाबाद प्रवास अवघ्या दोन तासांवर येणार
मुंबई, 02 जानेवारी (हिं.स.) - बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील पालघर येथे दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याची घोषणा करून केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पातील एका महत्त्वपूर्ण टप्प्याची माहिती दिली. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील हा पहिला पर्वतीय बोगदा आहे. विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान पालघर जिल्ह्यातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक असलेल्या सुमारे 1.5 कि.मी. लांबीच्या पर्वतीय बोगद्यात (एमटी -5) ही महत्त्वपूर्ण प्रगती साध्य करण्यात आली आहे.
एमटी-5 बोगद्याचे उत्खनन दोन्ही बाजूंनी करण्यात आले आणि अत्याधुनिक ड्रिल आणि ब्लास्ट पद्धतीचा वापर करून 18 महिन्यांत हे उत्खनन पूर्ण झाले. या पद्धतीमुळे उत्खनन करताना प्रत्यक्ष स्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे शक्य झाल्याने प्रत्यक्ष जागेच्या परिस्थितीनुसार शॉटक्रिट, रॉक बोल्ट आणि लॅटिस गर्डरसारख्या आधार प्रणालींची उभारणी करणे शक्य झाले. बोगद्याचे खोदकाम सुरु असताना संपूर्ण कालावधीत वायुवीजन, अग्निरोधक यंत्रणा आणि इतर उपाययोजना तसेच योग्य प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था यांसह आवश्यक सर्व सुरक्षितता उपाय अत्यंत काळजीपूर्वक पाळण्यात आले आहेत.
याआधी सप्टेंबर 2025 मध्ये ठाणे ते बीकेसी दरम्यान 5 किलोमीटर लांबीच्या पहिल्या भूमिगत बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्पाची एकूण लांबी 508 किलोमीटर आहे. यामध्ये एकूण 27.4 किलोमीटर. लांबीचे बोगदे असून, त्यापैकी 21 किलोमीटर भूमिगत बोगदे आणि 6.4 किलोमीटर भूपृष्ठावरील बोगदे आहेत. या प्रकल्पांमध्ये आठ पर्वतीय बोगद्यांचा समावेश असून महाराष्ट्रात 6.05 किलोमीटर एकूण लांबीचे सात बोगदे आहेत तर गुजरात मध्ये 350 मीटर लांबीचा एक बोगदा आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतर आणखी संधी उपलब्ध होतील, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई–अहमदाबाद प्रवासाला फक्त 1 तास 58 मिनिटे इतका वेळ लागेल आणि त्यामुळे मोठ्या व्यापारी केंद्रांची अर्थव्यवस्था एकत्र जोडली जाईल, असे त्यांनी विशद केले.
हा प्रकल्प मार्ग व्यापार‑उद्योगाची हालचाल वाढवेल, माहिती आणि कौशल्याची देवाणघेवाण सोपी करेल आणि नवीन कारखाने व आयटी केंद्रे उभारण्यास मदत करेल. यामुळे दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळतील आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा पूर्ण होतील, कारण त्यांना आरामदायी व परवडणारा प्रवास मिळेल, असे वैष्णव यांनी नमूद केले.
प्रकल्प पूर्ण झाल्यावर रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात सुमारे 95 टक्के घट होईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या 7 पर्वतीय बोगद्यांवर काम सुरू आहे. एमटी-1 (820 मीटर) ने 15% प्रगती केली आहे. एमटी-2 (228 मीटर) तयारीच्या टप्प्यात आहे, एमटी-3 (1,403 मीटर) ने 35.5% पूर्ण केले आहे, एमटी-4 (1,260 मीटर) ने 31% प्रगती केली आहे, तर सर्वात मोठा एमटी-5 (1,480 मिटर ~1.5 km) 55% पूर्ण झाला. 2 जानेवारी 2026 रोजी त्या बोगद्याचे खोदकाम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आणि दोन्ही बाजू जोडल्या गेल्या. एमटी-6 (454 मिटर) ने 35% प्रगती केली आहे आणि एमटी-7 (417 मिटर) ने 28% प्रगती केली आहे. महाराष्ट्रातील पर्वतीय बोगद्यांची एकूण लांबी सुमारे 6 किलोमीटर आहे.
मुंबई–अहमदाबाद उच्च-गती रेल्वे मार्ग (एमएएचएसआर) प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 508 किलोमीटर असून त्यापैकी 352 किलोमीटर गुजरात व दादरा-नगर हवेलीमध्ये आणि 156 किलोमीटर महाराष्ट्रात आहे. हा मार्ग साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सूरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई या प्रमुख शहरांना जोडणार आहे. हा भारताच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये एक परिवर्तनकारी टप्पा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी