
बीड, 21 जानेवारी, (हिं.स.) - टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये बीड जिल्ह्यातील धावपटूंनी जिद्द, शिस्त आणि संयमाचे दर्शन घडवत उल्लेखनीय कामगिरी केली. मुंबईच्या प्रचंड आर्द्र वातावरणात शारीरिक व मानसिक कसोटीला सामोरे जात बीडच्या रनर्सनी फुल व हाफ मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करत जिल्ह्याचा अभिमान उंचावला.
टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 किलोमीटर (फुल मॅरेथॉन) स्पर्धेत बीडच्या योगा ग्रुपचे शरद खिल्लारे यांनी 03:33:32 वेळेसह दमदार धाव घेतली. त्यांच्यासोबत डॉ. विश्वास गवते (04:01:39), डॉ. संजय जानवळे (04:34:09), कल्याण काका कुलकर्णी (04:50:54), डॉ. रोहन गायकवाड (05:10:28), जयेश भूत पल्ले (05:19:43), सुदर्शन शिंदे (05:23:46), ज्ञानेश्वर भोईटे (05:27:52) आणि अशोक पुरणे (06:34:14) यांनीही फुल मॅरेथॉन पूर्ण केली. 21 किलोमीटर (हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पूजा जाधव यांनी 01:51:36 वेळेसह उल्लेखनीय कामगिरी केली. संतोष भोकरे (01:57:01), वायभट तुकाराम (02:12:07) आणि विजय वाघमारे (02:22:16) यांनीही हाफ मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. टाटा मुंबई मॅरेथॉनचे नियोजन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानले जाते. मॅरेथॉनसाठी मुंबईतील प्रमुख रस्ते तब्बल सात तासबंद ठेवण्यात येतात. सुरक्षितता, वैद्यकीय सुविधा, स्वयंसेवकांचे जाळे तसेच पाणी व ऊर्जा पुरवठ्याची उत्कृष्ट व्यवस्था असल्याने ही स्पर्धा जागतिक पातळीवर ओळखली जाते. दरम्यान, बीडमध्ये योगा ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेली धावण्याची चळवळ आता व्यापक स्वरूप धारण करत आहे. आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीकडे नेणारी ही चळवळ युवकांसह सर्व वयोगटांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis