नेताजी सुभाषचंद्र बोस : अदम्य साहसाचे धगधगते प्रतीक
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अनेक तेजस्वी तारे चमकले, परंतु ज्यांच्या नावाने आजही अंगावर शहारे येतात आणि मनात राष्ट्रभक्तीचे स्फुरण चढते, ते नाव म्हणजे ''नेताजी'' सुभाषचंद्र बोस. २३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन आपण ''पराक्रम दिवस'' म्ह
नेताजी सुभाषचंद्र बोस: अदम्य साहसाचे धगधगते प्रतीक


भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अनेक तेजस्वी तारे चमकले, परंतु ज्यांच्या नावाने आजही अंगावर शहारे येतात आणि मनात राष्ट्रभक्तीचे स्फुरण चढते, ते नाव म्हणजे 'नेताजी' सुभाषचंद्र बोस. २३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन आपण 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करतो. नेताजी केवळ एक नेते नव्हते, तर ते अदम्य साहस, जाज्वल्य राष्ट्रप्रेम आणि संघर्षाचे जिवंत प्रतीक होते.

नेताजींचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशातील कटक येथे झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. वडिलांच्या इच्छेखातर ते इंग्लंडला गेले आणि त्याकाळी अत्यंत कठीण मानली जाणारी 'आय.सी.एस.' (ICS) परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु सुभाषबाबूंनी आय.सी.एस. (ICS) परीक्षेत यश मिळवूनही, ब्रिटिशांची चाकरी नाकारून देशसेवेचा मार्ग निवडला.

सुरुवातीला त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये राहून कार्य केले. दोनदा त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र, त्यांचे विचार तत्कालीन मवाळ राजकारणापेक्षा वेगळे होते. केवळ अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही, असे वाटल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला.

ब्रिटीश सरकारच्या नजरकैदेतून वेशांतर करून बाहेर पडणे, काबूलमार्गे जर्मनी आणि तिथून पाणबुडीने जपानचा प्रवास करणे, हा त्यांचा प्रवास एखाद्या थरारक चित्रपटासारखा वाटतो. त्यांनी सिंगापूरमध्ये 'आझाद हिंद फौजे' ची (INA) धुरा सांभाळली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा! ही त्यांची हाक ऐकून हजारो तरुण, महिला आणि सामान्य नागरिक स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यायला तयार झाले. 'झाशीची राणी' या नावाने त्यांनी महिलांचे स्वतंत्र लष्करी पथक तयार केले, जे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि स्त्री-शक्तीवरील विश्वासाचे दर्शन घडवते.

*आजच्या तरुणांसाठी प्रेरणा*

*आजच्या बदलत्या काळात नेताजींचे विचार तरुणांसाठी केवळ वाचण्याचे विषय नसून आचरणात आणण्याचे मंत्र आहेत:*

*१. निर्भीडता आणि स्वाभिमान:* नेताजींनी कधीही तडजोड केली नाही. आजच्या तरुणांनी आपल्या करिअरमध्ये किंवा आयुष्यात येणाऱ्या संकटांना न घाबरता, स्वाभिमानाने सामोरे जाणे आवश्यक आहे.

*२. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द:* परदेशात जाऊन, कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी एक शक्तिशाली लष्कर उभे केले. संसाधनांच्या अभावाचे रडगाणे न गाता, जे आहे त्यातून यश मिळवण्याची प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडून मिळते.

*३. राष्ट्रीय एकात्मता:* आझाद हिंद फौजेत सर्व धर्माचे लोक खांद्याला खांदा लावून लढले. आजच्या तरुणांनी जातीय आणि धार्मिक भिंती तोडून 'राष्ट्रप्रथम' हा विचार अंगीकारणे हीच काळाची गरज आहे.

*४. कर्तृत्व आणि कष्ट:* यश मिळवण्यासाठी आपण केवळ स्वप्न पाहून चालत नाही, तर त्यासाठी किंमत मोजावी लागते, हा नेताजींचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे.

नेताजींचे आयुष्य हे संघर्षातून यशाकडे आणि बलिदानातून अमरत्वाकडे जाणारा प्रवास आहे. त्यांचा मृत्यू हा आजही एक गूढ असला, तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. नेताजींच्या स्वप्नातील समर्थ, सामर्थ्यवान आणि आत्मनिर्भर भारत घडवणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.

*-स्वरूप रोहिणी चाया हुले, अलिबाग*

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande