प्रजासत्ताक दिन संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष
मुंबई, 26 जानेवारी (हिं.स.) : प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदनानंतर झालेल्या संचलनात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला पर्
कोकण पर्यटन चित्ररथ


मुंबई, 26 जानेवारी (हिं.स.)

: प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदनानंतर झालेल्या संचलनात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला पर्यटन विभागाचा ‘कोकण पर्यटन’ हा चित्ररथ विशेष आकर्षण ठरला.

यावेळी कोकण विभागाच्या उपसंचालक (पर्यटन) डॉ. प्रज्ञा मनोहर यांच्यासह पर्यटन विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोकणच्या समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधांचा सुरेख संगम या चित्ररथातून सादर करण्यात आला.

या चित्ररथाच्या माध्यमातून कोकणच्या विस्तीर्ण किनारपट्टीसह तेथील प्रमुख पर्यटन स्थळांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. अरबी समुद्र किनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या अभेद्य विजयदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती तसेच गणपतीपुळे मंदिराचा देखावा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. यासोबतच कोकणातील निसर्गरम्य होम स्टे आणि ग्रामीण पर्यटनाचा देखावा, स्कुबा डायव्हिंग, डॉल्फिन प्रतिकृती आणि जलक्रिडांमधील लोकप्रिय बनाना राइडचे कलात्मक सादरीकरण करण्यात आले.

कोकणच्या दळणवळणात क्रांती घडवून आणणाऱ्या रो-रो फेरीची प्रतिकृती हे चित्ररथाचे मुख्य आकर्षण ठरले. यामुळे कोकणचे नैसर्गिक सौंदर्य, साहसी पर्यटन आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना घेता आला.

या चित्ररथासोबत पर्यटन विभागाने सादर केलेले विशेष गीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या गीतातून कोकणचे पर्यटन प्रभावीपणे मांडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मुख्य संचलनात सहभागी झालेल्या या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाचा डंका पुन्हा एकदा देशभर गाजला.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, “प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात ‘कोकण पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथाचा आम्हाला अभिमान असून कोकणचा नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा देशभर पोहोचवण्याचा हा प्रभावी प्रयत्न आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन क्षमतेचे सशक्त दर्शन घडले आहे. हा उपक्रम कोकण पर्यटनाला नवी ऊर्जा देणारा ठरेल.”

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील म्हणाले की, “कोकण पर्यटन चित्ररथातून पारंपरिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधा यांचा समतोल साधण्यात यश आले आहे. विजयदुर्ग, गणपतीपुळे, जलक्रीडा आणि रो-रो फेरीसारख्या संकल्पनांमुळे प्रेक्षकांना कोकणचा सर्वांगीण अनुभव मिळाला. हा चित्ररथ महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande