तिरंगा देशाची आन-बान-शान; महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा : हर्षवर्धन सपकाळ
* प्रजासत्ताक दिन प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये उत्साहात संपन्न मुंबई, 26 जानेवारी (हिं.स.) - तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणास
हर्षवर्धन सपकाळ


* प्रजासत्ताक दिन प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये उत्साहात संपन्न

मुंबई, 26 जानेवारी (हिं.स.) - तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस जोजो थ़ॉमस, झिशान अहमद, श्रुती म्हात्रे यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे, ही एक मोठी साधना आहे आणि साधनेला संघर्षाची जोड आहे. संघर्षाचा हा मुलमंत्र आपण जपला पाहिजे. आज देशात काही शक्ती जातीपातीचे, धर्माचे राजकारण करत आहेत. कोणाला हिरव्या रंगाचे तर कोणाला भगव्या रंगाचे राजकारण करायचे आहे. हिरवा व भगवा या रंगाचा आदरच आहे. हिरवा रंग सुबत्तेचे तर भगवा रंग हा त्यागाचे, सन्मानाचे प्रतिक आहे, तिरंगा हा एक विचार आहे, स्वप्न आहे त्यासाठी आम्ही आजही रक्त सांडण्यास तयार आहोत असे सपकाळ म्हणाले.

भारतीय जनता पक्ष व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मोहम्मद अली जिना यांच्या पक्षाबरोबर जनसंघाने निवडणुका लढवल्या व त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केले, त्या सरकारमध्ये जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, आज त्याचे पुनरुज्जीवन केले जात आहे, असेही सपकाळ म्हणाले.

खरा आका हे देवेंद्र फडणवीसच..

सातारा जिल्ह्यातील ड्रग्जप्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, याआधी सातारा जिल्ह्यात ड्रग्जचा एक कारखाना सापडला होता, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या शेतात होता, याठिकाणी काम करणाऱ्या ४३ पैकी ४० बांग्लादेशी कामगारांना सोडून देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना क्लिन चिट देऊन टाकली. त्यावेळीच कठोर कारवाई केली असती तर आज पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा सापडला नसता. या ड्रग्जच्या काळ्या धंद्यातून आलेला पैसा मतदार व विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी खरेदी करण्यासाठी केला जात आहे. या सर्व प्रकरणाचा खरा आका हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केला आहे.

संविधानिक पदाचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना पद्म पुरस्कार

भगतसिंह कोश्यारी हा विकृत माणून असून संविधानिक पदाचा त्यांनी अपमान केलेला आहे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या तसेच शिव, शाहू, फुले यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. पुण्यातील एका सामाजिक संस्थेने मला पुरस्कार जाहीर केला होता, मात्र तो पुरस्कार कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात येणार होता, त्यामुळे मी त्या पुरस्काराला नकार दिला, असेही सपकाळ म्हणाले..

दावोस गुंतवणुकीची वस्तुस्थिती जाहीर करा

दावोसमधील गुंतवणुकीसंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्यात गुंतवणूक आली पाहिजे पण देवेंद्र फडणवीस हे, खोटं बोल पण रेटून बोल, पद्धतीने मोठे दावे करत आहेत. याआधी त्यांनी दावोसमधून १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचा दावा केला होता, त्याची वस्तुस्थिती काय, हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande