
वाशिम, 26 जानेवारी (हिं.स.) - जिल्ह्याचा प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनू शकतो. वाशिम जिल्ह्यात नंबर एकचा जिल्हा बनवण्याची क्षमता आहे. आपल्या संविधानाच्या आदर्शांवर चालत, आपण विकासाची नवी शिखरे गाठूया. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
आज दि.(२६) रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, भाप्रसे परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा,अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,अपर पोलीस अधिक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्यासह इतर मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.भरणे म्हणाले, वाशिम जिल्ह्याने शेती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. जिल्ह्याच्या विकासाबाबत शेती, रोजगार, पाणी व्यवस्थापन, रस्ते, घरकुल योजना, महिला सक्षमीकरण, युवकांचे कौशल्य विकास आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यावर विशेष भर देण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत, ही बाब निश्चितच समाधानकारक आहे. यावर्षी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बंधु भगिनींना अभूतपूर्व अश्या अतिवृष्टीचा सामना करावा लागला. मात्र राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून माहे जून २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना रुपये ४३१ कोटी अनुदान शासनाकडून वितरित करण्यात आले आहे. सुधारित पीक विमा योजनेत खरीप २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील १ लक्ष १२ हजार विमा अर्जदारांचे १ लक्ष ६९ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. रब्बी २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांचे २८ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत आजअखेर २ कोटी ९९ लक्ष रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत ३ हजार शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर २,२६२ क्विंटल बियाणे वितरित करण्यात आले आहे. सन २०२५-२६ मध्ये महा-डिबीटीच्या माध्यमातून ६३६ लाभार्थ्यांना ४ कोटी ३४ लाख रुपये यांत्रिकीकरण अनुदान वितरित करण्यात आले आहे. आज बळीराजा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. ३६ हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करून वापरास सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये ९ कोटी ८९ लक्ष रुपये, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत २ कोटी ७५ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वाशिम जिल्ह्यातील १७५ शाळांचे ‘स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’ अंतर्गत आमूलाग्र रूपांतरण करण्यात आले असून जिल्हा परिषद शाळांना गुणवत्तेचा नवा आयाम मिळाला आहे.
पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले , प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये ६९ हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. रमाई आवास योजना अंतर्गत ११ हजार, तर शबरी आवास योजना अंतर्गत २ हजार घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत ९ हजार घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. उमेद अभियान अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये ४० हजार महिला लखपती दीदी झाल्या असून चालू वर्षात ३६ हजार महिला लखपती दीदी होण्याच्या मार्गावर आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजनेतील ५० हजार शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदूळ, तसेच जानेवारी २०२६ पासून साखर दिली जात आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील ८ लक्ष 33 हजार लाभार्थ्यांना गहू व तांदूळ वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार सौर कृषी पंप कार्यान्वित आहेत.तसेच १५५ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले जात असून मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहेत. जिल्हा रुग्णालय वाशिम येथे कॅथलॅब, क्रिटिकल केअर युनिट, एमआरआय सेवा प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या ४७८ किलोमीटर लांबीच्या राज्य मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीची ११६ कोटी रुपयांची २२ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच १ हजार ११५ किलोमीटरच्या प्रमुख जिल्हा व ईतर मार्गांच्या दुरुस्तीची ५०७ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय हायब्रीड ऍन्युईटी अंतर्गत सुध्दा कोट्यवधी रुपयांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. श्री.संत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ३९७ कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून आतापर्यंत २६६ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहे.उमरी–पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ३२६ कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून १९१ कोटींची कामे पूर्ण झाली आहे. महसूल विभागामार्फत ३ लक्ष २० हजार दाखले वितरीत करण्यात आले असून आपले सरकार पोर्टलवरील सेवा वितरणाचा दर ९९.४८% आहे. जिल्ह्यात एकूण ७६४ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे कार्यशील असून काही महाविद्यालयांमध्ये सुध्दा ‘आपले सरकार’ सेवा केंद्र कार्यान्वीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत २० जानेवारी २०२६ पर्यंत २९५ प्रकरणांना मंजुरी देऊन युवक, महिला, बचत गट व उद्योजकांना उद्योगासाठी आर्थिक बळ मिळाले आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२५-२६ अंतर्गत जिल्ह्यातील विकासकामांसाठी २२ जानेवारी अखेर ३१५ कोटींच्या नियतव्ययापैकी २५२ कोटी १९ लक्ष किंमतीच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी