
अॅमस्टरडॅम, २८ जानेवारी (हिं.स.) टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक विजेता डी. गुकाशचा चढ-उतार सुरूच राहिला. नवव्या फेरीत जर्मन ग्रँडमास्टर मॅथियास ब्लूबॉम यांच्याकडून गुकेशला पराभव पत्करावा लागला. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना गुकेश या सामन्यात पूर्णपणे निराशाजनक दिसून आला. त्याच्या गेल्या चार सामन्यांमधील हा तिसरा पराभव होता.
या विजयासह ब्लूबॉम त्याच्या कारकिर्दीत प्रथमच २७०० रेटिंग क्लबमध्ये सामील होण्याच्या जवळ पोहोचला आहे. त्याचे लाईव्ह रेटिंग २६९५.१ वर पोहोचले आहे आणि तो आता FIDE कॅंडिडेट्समध्ये २७००+ बुद्धीबळपटू म्हणून पात्र होण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.
दरम्यान, भारताच्या आर. प्रज्ञानंदाने भारताच्याच अरविंद चिथंबरमला पराभूत करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला आणि विजयाची दीर्घ प्रतीक्षा संपवली. अर्जुन एरिगाईसीने अमेरिकन ग्रँडमास्टर हान्स निमनविरुद्धचा सामना अनिर्णित राखला.
नऊ फेऱ्यांनंतर, गुकेश, एरिगाईसी आणि प्रज्ञानंद या सर्वांचे प्रत्येकी चार गुण आहेत, तर अरविंद चिथंबरम २.५ गुणांसह टेबलच्या तळाशी आहेत. उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह सहा गुणांसह टेबलच्या शीर्षस्थानी आपले स्थान कायम ठेवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे