
नवी दिल्ली , 29 जानेवारी (हिं.स.)।भारतासोबतचे संबंध ताणलेले असतानाही बांग्लादेशला पुन्हा एकदा मदतीची गरज भासली आहे. देशात नैसर्गिक वायूची कमतरता आणि वीजेची वाढती मागणी लक्षात घेता, अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवर बांग्लादेशकडे वीज निर्यात वाढवत आहे. दोन्ही देशांच्या सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
भारतीय आणि बांग्लादेशी सरकारी डेटानुसार, झारखंडमधील गोड्डा येथे असलेल्या अदानीच्या कोळसा-आधारित वीज प्रकल्पातून बांग्लादेशला होणारी वीज निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिसेंबरपर्यंतच्या तीन महिन्यांत ही वीजपुरवठा वार्षिक आधारावर सुमारे 38 टक्क्यांनी वाढून 2.25 अब्ज किलोवॅट-तास (kWh) इतका झाला आहे.
बांग्लादेश सरकारच्या माहितीनुसार, भारताकडून येणारी वीज आता देशाच्या एकूण वीज मिश्रणातील 15.6 टक्के इतकी विक्रमी पातळी गाठली आहे, जी 2024 मध्ये 12 टक्के होती. अदानी पॉवरने 2023 पासून बांग्लादेशला वीजपुरवठा सुरू केला असून तो आजही सुरू आहे. म्हणजेच, दोन्ही देशांमधील कूटनीतिक संबंध बिघडले असतानाही वीज व्यापार मात्र जोरात सुरू आहे. मात्र, बांग्लादेश सरकारने नेमलेल्या एका समितीने भारतातून येणारी वीज गरजेपेक्षा महाग असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, ढाका येथील स्वतंत्र ऊर्जा तज्ज्ञ एजाज हुसेन यांनी सांगितले, “अदानीची वीज अजूनही तेलावर आधारित वीजेपेक्षा स्वस्त आहे. कमतरतेमुळे बांग्लादेशला तेलावर चालणारे वीज प्रकल्प वापरावे लागत आहेत.”सध्या दोन्ही देशांतील तणाव इतका वाढला आहे की भारत आणि बांग्लादेश यांनी एकमेकांसाठीची व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.
बांग्लादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष रेजाउल करीम यांनी माध्यमांना सांगितले की, वीजटंचाई कमी करण्यासाठी वीज आयातीची गरज आहे. यामध्ये नैसर्गिक वायूची कमतरता हा मोठा घटक आहे, कारण नैसर्गिक वायू हा बांग्लादेशचा प्रमुख वीज स्रोत आहे. अशा परिस्थितीत 2026 मध्ये वीजेची मागणी 6 ते 7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
करीम यांनी पुढे सांगितले की, गॅस टंचाई भरून काढण्यासाठी बांग्लादेश यावर्षी देशांतर्गत कोळसा-आधारित वीज निर्मिती वाढवणार असून त्यासाठी कोळशाच्या आयातीतही वाढ केली जाणार आहे. आकडेवारीनुसार, 2025 मध्ये कोळशाची आयात 35 टक्क्यांनी वाढून विक्रमी 17.34 दशलक्ष मेट्रिक टन इतकी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode