
बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि चीनपर्यंत हादरे जाणवले
गुवाहाटी, 05 जानेवारी (हिं.स.)। ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ०४.१७.४० वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी नोंदवली गेली. अचानक आलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही काळ धक्के सतत जाणवत होते.
आसामसह शेजारील मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम या राज्यांमध्ये तसेच भारताच्या शेजारील बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि चीनमध्येही या मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचे परिणाम जाणवले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाचे केंद्र आसाममधील मोरीगाव जिल्ह्यापासून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर, जमिनीखाली ५० किलोमीटर खोलीवर होते. भूकंपाचा केंद्रबिंदू (एपिसेंटर) २६.३७ अंश उत्तर अक्षांश आणि ९२.२९ अंश पूर्व रेखांशावर होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule