
मुंबई, 05 जानेवारी (हिं.स.)। अदा शर्मा यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वी तीव्र टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, रिलीज़नंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. या मोठ्या यशानंतर आता निर्माता विपुल अमृतलाल शाह या चित्रपटाच्या सीक्वलसह प्रेक्षकांसमोर परत येत आहेत.
या सीक्वलची घोषणा यूट्यूबवर ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ या शीर्षकाच्या व्हिडिओद्वारे करण्यात आली असून, त्यामध्ये चित्रपटाच्या रिलीज़ डेटचाही खुलासा करण्यात आला आहे. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कामाख्या नारायण सिंह यांनी सांभाळली आहे. मात्र, कलाकारांविषयीची माहिती सध्या जाहीर करण्यात आलेली नाही.
‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’च्या टीझरमध्ये फक्त चित्रपटाचे नाव दाखवण्यात आले आहे, पण त्यासोबत दिलेले कॅप्शन बरेच काही सांगून जाते. कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “त्यांनी सांगितले की ही फक्त एक कथा आहे. त्यांनी ती दाबण्याचा प्रयत्न केला, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण सत्य थांबले नाही. कारण काही कथा कधीच संपत नाहीत. यावेळी ही कथा अधिक खोल आहे. यावेळी ती अधिक वेदनादायी आहे.”
टीझरसोबतच हेही स्पष्ट करण्यात आले आहे की ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रेक्षक त्याच्या पुढील अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule