लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण - अकोला आयुक्त
अकोला, 06 जानेवारी (हिं.स.)। लोकशाही व्यवस्थेत निवडणुका म्हणजे उत्सव असतो. चौथास्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माध्यम क्षेत्रातील पत्रकारांची भूमिका निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण व समाजासाठी दिशादर्शक असते, असे प्रतिपादन अकोला महापालिका आयुक
लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण - अकोला आयुक्त


अकोला, 06 जानेवारी (हिं.स.)। लोकशाही व्यवस्थेत निवडणुका म्हणजे उत्सव असतो. चौथास्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माध्यम क्षेत्रातील पत्रकारांची भूमिका निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण व समाजासाठी दिशादर्शक असते, असे प्रतिपादन अकोला महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सुनील लहाने यांनी आज येथे केले.

अकोला महानगर पालिका, श्री शिवाजी महाविद्यालय आणि अकोला श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनानिमित्त मतदार जनजागृती व पत्रकार कार्यशाळेचे आयोजन वसंत सभागृहात करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आशिष राऊत यांच्या अध्यक्षते झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. हर्षवर्धन पवार उपस्थित होते. शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. संघटनेचे माजी अध्यक्ष अजय डांगे, उपाध्यक्ष शरद पाचपोर, सचिव विशाल बोरे, प्रमोद गावंडे, डॉ. श्रीकांत उखळकर, गोपाल हागे, दीपक अवताडे, प्रवीण खेते, शिवम पाथरकर आदींनी अतिथींचे स्वागत केले.

पुढे डॉ. लहाने म्हणाले, लोकशाहीमध्ये अधिकारासोबतच कर्तव्य देखील असतात. मतदान करणे ही मतदारांची मुख्य जबाबदारी. देशातील प्रत्येक नागरिकाने मतदान हे केलेच पाहिजे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. डॉ. हर्षवर्धन पवार यांनी लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांच्या भूमिकेवर सविस्तर मांडणी केली. निवडणुकांमध्ये पत्रकारांनी निष्पक्ष पत्रकारिता करावी. पत्रकारांच्या लेखनीमधूनच शासन, प्रशासनाचे लक्ष वेधून शाश्वत विकास घडतो, असे मत डॉ. पवार यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी विश्वासार्हता आणि अचूकपणा जोपासण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत प्रबोध देशपांडे यांनी व्यक्त केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी जनजागृती केली जात असून मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, असा विश्वास हरिश्चंद्र इटकर यांनी व्यक्त केला. शहराचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन डॉ. आशिष राऊत यांनी केले.

कार्यक्रमाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, संजय खराटे, सामर्थ्य फाउंडेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, सामाजिक कार्यकर्ते जावेद जकारिया, ज्येष्ठ पत्रकार राजकुमार उखळकर, रवींद्र बुलनकर, किरण चौक, सूर्यकांत बुडकले, विलास राठोड, राजेंद्र निकुंभ, प्रमोद रत्नपारखी, ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. सत्यनारायण बाहेती, भावसार समाजाचे पदाधिकारी अनिल मावळे यांच्यासह पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी जाणले मतदानाचे महत्त्व

नवमतदार विद्यार्थ्यांनी निवडणुकीतील मतदानाचे महत्त्व जाणून घेतले. मतदार जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी हरिश्चंद्र इटकर, प्रा.डॉ. श्रीकांत उखळकर यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande