
अकोला, 07 जानेवारी (हिं.स.)।
राजकारणात काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय अकोल्यात आला आहे.. भाजपने सत्तेसाठी एमआयएम सोबत हातमिळवणी केल्याचं समोर आले. दरम्यान आता या प्रकरणात भाजपने यूटर्न घेतला आहे. सत्तेसाठी अकोट विकास मंचाच्या नावावर एकत्र आणण्याचा प्रताप अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भिन्न विचारधारेमुळे युती शक्य नसल्याचे दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने स्पष्ट केले. पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरुंग लावणाऱ्या आमदार भारसाकळे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नोटीस बजावून खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.
अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी करण्यात आलेली भाजप आणि एमआयएमची अभद्र युती सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या युतीवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असतानाच, आता एमआयएमकडून या प्रकरणावरून यु-टर्न घेण्यात आला आहे.
एमआयएमचे नेते युसुफ पुंजाजी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले असून, एमआयएमच्या उमेदवारांना विश्वासात न घेता ही युती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच अकोट येथील आघाडीतील नगरसेवकांनी ‘अकोट विकास मंच’ स्थापन केल्याचा सुरुवातीला बोलण्यात आलं होतं मात्र यामध्ये युतीचे घटक पक्ष दिसून आल्याचं ते म्हणाले.या सर्व घडामोडींनंतर एमआयएम या युतीतून बाहेर पडल्याचं युसुफ पुंजाजी यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, भाजपकडूनही या युतीबाबत काहीशी माघार घेतल्याचं चित्र दिसत आहे. एमआयएम पक्षासोबत नव्हे, तर केवळ उमेदवारांशी युती केल्याचा दावा भाजप आमदार रणवीर सावरकर यांनी केला आहे. भाजपची विचारधारा मान्य करून एमआयएम पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपासोबत येणाऱ्या उमेदवारांशीच युती कायम ठेवली जाईल, असंही सावरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
या घडामोडींमुळे अकोट नगरपरिषदेतील सत्तास्थापनेचा पेच अधिकच वाढला असून, राजकीय वातावरण तापलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे