
अकोला, 6 जानेवारी, (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तसेच माजी जिल्हाप्रमुख हिदायत पटेल यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 ते 3 अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हिदायत पटेल यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हल्ल्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
आमदार साजिद खान यांचा निषेध!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी हा हल्ला राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या निवडणुकीचा माहोल असताना काँग्रेसच्या मोठ्या नेत्यावर झालेला हा हल्ला निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.आमदार साजिद खान पठाण यांनी सांगितले की, या प्रकरणातील संबंधित आरोपींची संपूर्ण माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे. मात्र, पोलिसांनी जर २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली नाही, तर काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतः आरोपींना शोधून पोलिसांच्या ताब्यात देतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे