नागपूरच्या सभेत मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर जोरदार टीकास्त्र
नागपूर, 06 जानेवारी (हिं.स.) महापालिका निवडणूकीसाठी नागपुरातील पहिल्या प्रचार सभेत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आम्ही फक्त विकासाचे राजकारण करतो, विरोधकांकडे कोणतीही ठोस निती, नियत वा काम करण्याची क्षमता
देवेंद्र फडणवीस


नागपूर, 06 जानेवारी (हिं.स.) महापालिका निवडणूकीसाठी नागपुरातील पहिल्या प्रचार सभेत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आम्ही फक्त विकासाचे राजकारण करतो, विरोधकांकडे कोणतीही ठोस निती, नियत वा काम करण्याची क्षमता नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. नागपूरच्या बोरगाव येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मी नगरसेवकांच्या पाठिशी उभे आहोत. त्यामुळे महायुतीचा नगरसेवक जे काम करू शकेल, ते इतर नगरसेवक करू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नागपूर शहराच्या विकासावर भर दिला. नागपूरला आम्ही आधुनिक शहर बनवले असून, आता ते देशातील सर्वोत्तम शहर होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांबाबतही माहिती दिली, ज्यामुळे उद्योग व रोजगार निर्माण झाले आहेत. मिहान प्रकल्पातून एक लाखांहून अधिक रोजगार तयार झाले असून, आणखी 2 लाख कोटींच्या गुंतवणुकीमुळे नवीन रोजगार निर्मिती होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी पट्टेवाटप, 24 बाय 7 पाणी योजना आणि गोरेवाडा झू प्रकल्प यांसारख्या योजनेचा उल्लेख करत विकासाचे ठोस उदाहरण दिले. पुढील दोन-तीन वर्षांत नागपूर पूर्णपणे टँकरमुक्त होईल. गोरेवाडा झूमध्ये 25 लाख पर्यटक येतील, आणि पंचतारांकित हॉटेल उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande