जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू
कोल्हापूर, 06 जानेवारी (हिं.स.) : महापालिका निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला असून १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामु
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू


कोल्हापूर, 06 जानेवारी (हिं.स.) : महापालिका निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला असून १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू झाल्या असून, संपूर्ण जिल्ह्यातून ६५० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाची लगबग वाढली आहे. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया १६ जानेवारी रोजी मतमोजणीने पूर्ण होणार आहेत. त्यानंतर पुढील दोन दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती तीन दिवस चालणार आहेत. पहिल्या दिवशी कागल, राधानगरी आणि भुदरगड विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर त्यांचा सविस्तर अहवाल राज्यस्तरीय नेत्यांकडे पाठवण्यात येणार असून, उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.

बुधवारी कोल्हापूर दक्षिण, करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा, तर गुरुवारी आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. या मुलाखतींसाठी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह माजी आमदार संजयबाबा घाटगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि महेश जाधव उपस्थित आहेत.

------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande