
परभणी, 06 जानेवारी (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणूकीत नेतेमंडळींसह उमेदवार व कार्यकर्त्यांनी विकासाचे मुद्देच प्रभावीपणे व ठासून मांडले पाहिजेत, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
येथील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाद्वारे आज मंगळवारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य रामकिशन रौंदळे, मोहन कुलकर्णी, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यासह अन्य नेते व्यासपीठावर विराजमान होते.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून आजतागायतपर्यंत उभारणीत दिग्गजांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मोठे योगदान राहीले आहे. सहजासहजी पक्ष, संघटना उभी राहीली नाही. त्यासाठी नेतेमंडळींसह लाखो कार्यकर्त्यांना खाचाखळगा भोगाव्या लागल्या. त्यामुळेच आता चांगले दिवस आले आहेत. परंतु, या अनुकूल स्थितीत सुध्दा नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी आततायीपणा न करता जमीनीवर राहीले पाहिजे, आपले नाते मातीशी, सर्वसामान्य नागरीकांशी राखले पाहिजे. राज्य असो, केंद्र सरकारने श्रमिकांसह सर्वसामान्य नागरीकांच्या हिताच्या अनेक योजना आणल्या आहेत. प्रभावीपणे त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. भविष्यातसुध्दा अनेक महत्वाकांक्षी योजना अंमलात येणार आहेत. त्यामुळेच नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र पुरस्कृत या योजनांचा अभ्यास केला पाहिजे, माहिती ठेवली पाहिजे. वेळोवेळी ती प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवली पाहिजे, असे आवाहन केले.
या निवडणूकीतसुध्दा विकासाचे मुद्देच हे प्राधान्याने मांडले पाहिजेत. राज्य व केंद्र सरकारने राबविलेल्या सर्व योजनांचा आढावा घेतला पाहिजे, त्या योजनातील लाभार्थ्यांपर्यत पोहोचले पाहिजे, लाडकी बहिण सारखी महत्वाकांक्षी योजना यशस्वीरीत्या आपण राबवित आहोत. परंतु, लाभार्थी असणारी ती लाडकी बहिण मतपेटीपर्यंत पोहोचली पाहिजे, अन्य योजनांतील लाभार्थ्यांचे सुध्दा अधिकाधिक मतदान झाले पाहिजे, मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी, प्रयत्न करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
दरम्यान, यावेळी महानगराध्यक्ष भरोसे यांनी प्रास्ताविक केले. तर पालकमंत्री सौ. साकोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis