
अमरावती, 06 जानेवारी (हिं.स.) अमरावती येथील बडनेरा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या गोपी इंडस्ट्री या केमिकल (थिनर) कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट (ब्लास्ट) होऊन मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा जळून मृत्यू झाला असून, आणखी एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास गोपी इंडस्ट्रीमध्ये अचानक ब्लास्ट झाला. स्फोटानंतर काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. कंपनीत त्या वेळी सात महिला कर्मचारी काम करत होत्या. आगीचा वेग इतका प्रचंड होता की, एका कर्मचाऱ्याला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव सोनाली सुनील कोडापे (वय २९) असे आहे. त्या वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून, फक्त आठवडाभरापूर्वीच या कंपनीत नोकरीला रुजू झाल्या होत्या. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दीर्घ प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. केमिकल हाताळणीसाठी आवश्यक असलेले सुरक्षा उपाय अपुरे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलीस व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.या प्रकरणी एमआयडीसी प्रशासन, पोलीस व कामगार विभाग संयुक्तपणे तपास करत आहेत. स्फोटाचे नेमके कारण, सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, याबाबत लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी