
अकोला, 07 जानेवारी (हिं.स.)। ही परिवर्तनाची सभा नाही, ही परिवर्तनाची नांदी आहे. येत्या पंधरा तारखेला अकोल्याच्या भविष्याचा फैसला करायचा आहे,” असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अकोल्यात झालेल्या परिवर्तन सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.
शिंदे म्हणाले, “अकोला महानगरपालिकेवर आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी सत्ता उपभोगली, पण नागरिकांना स्वच्छ पाणीसुद्धा देऊ शकले नाहीत. आता त्यांनाच पाणी पाजण्याची वेळ आली आहे. लोकांना मूलभूत सुविधांचा अजेंडा आपला आहे — पिण्याचे पाणी, चांगल्या शाळा, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारी आणि शहरात बाग-बगीचे ही आपली बांधिलकी आहे.”
ते पुढे म्हणाले, “सत्ता कोणाची आहे हे आम्ही पाहत नाही. लोकांच्या विकासासाठी आम्ही निधी देतो. बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा आमच्याकडे आहे.”
उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष प्रहार करत शिंदे म्हणाले, “राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा यांचा जीव मुंबईत अडकला आहे, महानगरपालिकेच्या तिजोरीत अडकला आहे. ते मुंबईच्या बाहेर येत नाहीत.”
शिंदे यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांप्रती निष्ठा व्यक्त करत सांगितले, “मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मालक-नौकरांचा नाही. ते मात्र कार्यकर्त्यांना गुलाम समजतात.”
सभेत महिलांबद्दल विशेष उल्लेख करत ते म्हणाले, “माझ्या लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार दाखवला, आता महानगरपालिकेतही चमत्कार दाखवा. कोणीही आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “महाराष्ट्रात कल्याणकारी योजना राबवून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य आम्ही साजरे करणार आहोत.”
अकोल्यातील विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांना आवाहन केले, “सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची भरती, बंद पडलेले नाट्यगृह, मोर्णा नदी संरक्षण भिंत यांसारखी कामे पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना महानगरपालिकेत पाठवा.”सभेतील उपस्थितांनी “जय बाळासाहेब, जय महाराष्ट्र”च्या घोषणा देत शिंदे यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे